ठाकरे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्या पुतण्याची होणार चौकशी, नेमकं प्रकरण काय..जाणून घ्या
By मनोज मुळ्ये | Published: December 25, 2023 01:21 PM2023-12-25T13:21:23+5:302023-12-25T13:21:58+5:30
अलिबाग लाचलुचपत प्रतिबंध खात्याची नोटीस
रत्नागिरी : उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांची रायगड लाचलुचपत प्रतिबंध खात्याकडून चौकशी सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून त्यांचा पुतण्या दुर्गेश साळवी यांनाही लाचलचपत प्रतिबंध खात्याने चौकशीसाठी बोलावले आहे. आमदार साळवी यांचा मुलगा शुभम आणि दुर्गेश साळवे यांची भागीदारीमध्ये कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, त्यामुळे ही चौकशी होणार आहे. आमदार साळवी यांच्या वहिनी अनुराधा साळवी यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
गतवर्षी डिसेंबर महिन्यापासून आमदार राजन साळवी यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर किती मालमत्ता आहे, याची तपासणी केली जात आहे. त्यासाठी आमदार राजन साळवी यांच्याप्रमाणेच त्यांचे भाऊ दीपक यांचीही चौकशी लाचलतपत प्रतिबंध खात्यामार्फत करण्यात आली आहे.
आता या चौकशीचा पुढचा टप्पा म्हणून आमदार साळवी यांचा पुतण्या दुर्गेश साळवी यांना लाचलचपत प्रतिबंध खात्यामार्फत नोटीस पाठवण्यात आली आहे. आमदार साळवी यांचा मुलगा शुभम आणि दुर्गेश साळवी यांची भागीदारीमध्ये साळवी कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी आहे. त्या अनुषंगाने ही चौकशी केली जाणार आहे. साळवी कन्स्ट्रक्शन कंपनीचे नोंदणीपत्र, त्यांच्या बँक खात्याचा तपशील तसेच आयकर विवरण पत्रासह २० डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना लाचलचपत प्रतिबंध खात्याने केली होती. मात्र दुर्गेश साळवी त्या तारखेला हजर नसल्याने आता २७ डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस लाचलचपत प्रतिबंध खात्याने दिली आहे.
आमदार साळवी यांची वहिनी अनुराधा साळवी यांनाही चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. अनुराधा साळवी आणि राजन साळवी यांची पत्नी अनुजा यांनी मिळून काही जमीन खरेदी केली आहे. त्याचे पैसे अनुराधा साळवी यांच्या बँक खात्यावरून देण्यात आले आहेत. या व्यवहाराच्या तपशीलासह अनुराधा साळवी यांना चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यांनाही २० डिसेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र त्या हजर न राहिल्याने आता त्यांना २७ डिसेंबर रोजी हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे.