रत्नागिरीतील केळशीत पलिता नृत्य परंपरा आजही कायम, गणेशोत्सवात विविध लोककला सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 06:15 PM2022-09-08T18:15:09+5:302022-09-08T18:15:37+5:30
काही ठिकाणी जाखडी नृत्य तर काही ठिकाणी बाल्या डान्स असे अनेक पारंपरिक नृत्य प्रकार त्या त्या भागाची वैशिष्ट्ये बनली आहेत.
दापोली : तालुक्यातील केळशी गावात गौरी, गणपती उत्सवात जपली जाते पलिता नाच संस्कृती. आजही ही परंपरा कायम आहे.
कोकणात गौरी, गणपतीच्या उत्सव काळात विविध पारंपरिक लोककला सादर होतात. खेळ करण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी जाखडी नृत्य तर काही ठिकाणी बाल्या डान्स असे अनेक पारंपरिक नृत्य प्रकार त्या त्या भागाची वैशिष्ट्ये बनली आहेत. त्यावरून त्या गावाची ओळख ठरविली जाते. केळशी गावही प्रसिद्ध आहे ते पलिता पारंपरिक नृत्यासाठी.
या गावातील आबालवृद्ध सर्वजण हातात मशाली घेऊन ढोलकीच्या तालावर पारंपरिक वेशभूषेत ठेका धरतात. येथील प्राचीन मंदिरासमोर हा नाच केला जातो. शेकडो वर्षे ही परंपरा या गावाने जपली आहे.
गौरी पूजनाच्या शेवटच्या रात्री पलिता नृत्य केले जाते. यामध्ये पुढील माणूस मशाल घेऊन असतो व बाकीच्या हातात पलिते असतात. हा नाच फक्त केळशी गावातच असतो. येथील जय हिंद आणि भंडारी समाज सादर करतो. यामध्ये महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग असतो.