चिपळुणातील कोसळलेल्या उड्डाणपुलाचा भाग अजून तसाच
By संदीप बांद्रे | Published: November 3, 2023 05:16 PM2023-11-03T17:16:51+5:302023-11-03T17:17:16+5:30
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपूलाचा भाग आणि त्यावरील लाँचर अद्याप काढण्यात आलेले नाही. कोसळलेला पुलाचा ...
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपूलाचा भाग आणि त्यावरील लाँचर अद्याप काढण्यात आलेले नाही. कोसळलेला पुलाचा भाग काढण्याबाबत आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील काम सुरू केले जाणार आहे. केंद्रीय तज्ज्ञ समितीचा चौकशी अहवालही अद्याप राष्ट्रीय महामार्ग विभागास प्राप्त झालेला नसल्याने उड्डाणपुलाच्या सर्वच कामाला विलंब लागण्याची चिन्हे आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून शहरातून जात असलेल्या उड्डाणपूलाचे काम सुरू असताना पंधरा दिवसांपूर्वी त्यातील काही भाग लॉंचरसह कोसळला. या दुर्घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची तज्ज्ञ समिती तयार करण्यात आली. या समितीतील टंडन कन्सल्टनचे मनोघ गुप्ता, हेगडे कन्सल्टन्सचे सुब्रमण्य हेगडे यांच्या समितीने दुर्घटनाग्रस्त पुलाची पाहणी केली. पुलाचे बांधकाम करणाऱ्यांमधील कंत्राटदार, निरीक्षण करणाऱ्या कंपन्यांचे अभियंते, अधिकारी यांचे जबाब घेतले होते. कोंडमळा येथे गर्डर बनवले जातात, त्या कास्टींग प्लान्टमध्ये जाऊन तेथील साहित्याचीही पाहणी करुन चौकशी केली. आठवडाभरात या समितीकडून प्राथमिक अहवाल महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंत्याना प्राप्त होणार होता. मात्र, तो अजूनही प्राप्त झालेला नाही.
या दुर्घटनाग्रस्त उड्डाणपुलाचा कोसळलेला भाग अजूनही तसाच आहे. त्यावरील लाँचर यंत्रणाही तशीच लोंबकळत आहे. दुर्घटनाग्रस्त पुलाच्या दोन्ही बाजूने असलेल्या सर्व्हिस रोडवरून वाहतूक सुरू असल्याने पुलाचे चित्र काहीसे भीतीदायक आहे. याबाबत महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कोसळलेला पूल, त्यावरील लाँचरसह यंत्रणा ही वजनशीर आहेत.
शिवाय त्यामध्ये टाकण्यात आलेल्या केबल्सही व्यवस्थित हाताळणे आवश्यक आहे. त्यामुळे पुलाचा कोसळलेला भाग आणि लाँचर यंत्रणा कशी काढायची याबाबतचा आराखडा तयार केला जात आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर ते काम हाती घेतले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.