रत्नागिरीत ढगाळ वातावरणातही विमान उतरणार, पालकमंत्री उदय सामंतांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 11:54 AM2023-09-15T11:54:31+5:302023-09-15T11:54:56+5:30
अत्याधुनिक यंत्रणा असलेले महाराष्ट्रातील पहिले विमानतळ ठरणार
रत्नागिरी : रत्नागिरीत पावसाचे प्रमाण अधिक आहे. आकाशात ढग अधिक असतील तर विमान उतरण्यात अडचणी येतात. त्या टाळण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच रत्नागिरी विमानतळावर अत्याधुनिक यंत्रणा बसवली जाणार आहे. ती यंत्रे रत्नागिरीत दाखल झाली आहेत. त्यासाठी १७ एकर अधिक जागेची गरज असून, ती आठ दहा दिवसांत हस्तांतरित केली जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
सामंत म्हणाले की, विमानतळावरील टर्मिनल इमारतीचे काम डिसेंबर महिन्यात सुरू होईल. कोस्टगार्डच्या टॅक्सी ट्रॅकचे काम महिन्याभरात सुरू होईल. येथील कंपाउंड वॉलचे काम महिनाभरात संपेल. सद्य:स्थितीत रत्नागिरी विमानतळावर अत्यावश्यक वेळी रात्री विमान उतरवता येऊ शकते. पण, ही नवीन अत्याधुनिक यंत्रणा बसवल्यानंतर नाइट लँडिंगही अधिक सोपे होईल, असेही सामंत यांनी सांगितले.
महावितरणला ९४८ काेटी
महावितरणसाठी जिल्ह्याला ९४८ कोटी १४ लाख रुपये मंजूर झाले आहेत. यातील आपत्कालीन कामांसाठी २९९ कोटी, किनारपट्टीवरील गावांमधील भुयारी वाहिन्यांसाठी ४५० कोटी, वीज वितरण हानी कमी करण्यासाठी जुन्या तारा बदलणे, डीपी बदलणे यासाठी ९८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सर्व मीटर बदलण्याचे काम केले जाणार आहे. नवीन उपकेंद्रे तसेच रोहित्र तसेच वाहिन्या यासाठी ४१४ काेटी रुपये मंजूर झाल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.