अणुस्कुरा घाटात चोरट्यांचा पाठलाग, एक जण ताब्यात; दुचाकी चोरुन निघाले होते पळून
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 12:57 PM2024-05-20T12:57:13+5:302024-05-20T12:57:32+5:30
घटनेनंतर घाट परिसरात चार ठिकाणी पोलिस पथके तैनात ठेवण्यात आली होती
राजापूर : दुचाकीची चोरी करून अणुस्कुरा घाटमार्गे कोल्हापूरच्या दिशेने पळणाऱ्या तिघांचा पोलिसांनी पाठलाग करून एकाला ताब्यात घेतले आहे. ताे अल्पवयीन असून, अन्य दाेघे पळून जाण्यात यशस्वी झाले. हा प्रकार शनिवारी घडला. या घटनेनंतर घाट परिसरात चार ठिकाणी पोलिस पथके तैनात ठेवण्यात आली होती. रविवारी दिवसभर सुमारे तीस पोलिसांची कुमक येरडव, अणुस्कुरा परिसरात फरार असलेल्या अन्य दोघांचा शोध घेत होती.
दोन दुचाकीवरून तीन अनोळखी तरुण ओणीमध्ये आले होते व तिथे त्यांनी पिस्तूलसारख्या दिसणाऱ्या लाईटरने काहींना धमकवण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराची माहिती राजापूर पोलिसांसह जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनाही देण्यात आली. हे तिघे ओणीवरून अणुस्कुरा घाटाच्या दिशेने निघाले होते. मात्र, अणुस्कुरा येथील तपासणी नाक्यावर पोलिस पाहून त्यांनी येरडवच्या दिशेने पलायन केले. वाटेतच दोन्ही दुचाकी टाकून ते आजूबाजूच्या जंगलात जाऊन लपले.
दरम्यान, पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी तत्काळ सूत्रे हलविली आणि मोठा पोलिस फौजफाटा घाट परिसरात वाढविला. ते स्वत: घटनास्थळी दाखल झाले होते. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने येरडव परिसरासह अणुस्कुरा घाटाचा परिसर पिंजून काढण्यात आला. त्यानंतर एक अल्पवयीन मुलगा पाेलिसांच्या तावडीत सापडला. मात्र, अन्य दोघे फरार होते. दुचाकीवरून आलेले तिघेही पारनेर (जि. अहमदनगर) मधील असल्याचे तपासात पुढे आले आहे.
शनिवारी रात्रभर येरडवच्या जंगल परिसरात पोलिस फरार झालेल्या दाेघांचा शोध घेत होते. रविवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू होती. राजापूरचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण व त्यांची टीम शोध घेत होती. रविवारी सकाळी फरार असलेल्या दाेघांना येरडवच्या जंगल परिसरात काहींनी पाहिले होते. मात्र, नंतर ते फरार झाले.
त्या आधी राजापूर पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक सुधीर उबाळे व राजापूर पोलिस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी ज्या दिशेने तरुण पळाले त्या डोंगराळ भागाचा तपास करत होते.
चाेरीची दुचाकी संगमेश्वरातील
फरार झालेल्या दाेघांची नावे दीपक श्रीमंदीलकर, अजय घेगडे अशी असल्याचे समजले. ते दोन दुचाकी चोरून पुण्याच्या दिशेने चालले होते. दोन्ही गाड्यांवर नंबर प्लेट नव्हती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार १६ मे राेजी संगमेश्वर तालुक्यातून एक दुचाकी चोरीला गेली होती. ती गाडी त्या तिघांकडे सापडली.