उद्घाटनापूर्वीच रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या छताचे पीओपी कोसळले
By अरुण आडिवरेकर | Published: October 7, 2024 01:02 PM2024-10-07T13:02:33+5:302024-10-07T13:05:00+5:30
रत्नागिरी : परतीच्या पावसाबरोबर आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने रत्नागिरी रेल्वेस्थानक सुशोभिकरण व नूतनीकरणाच्या कामाला रविवारी सायंकाळी जोरदार तडाखा दिला. सुदैवाने ...
रत्नागिरी : परतीच्या पावसाबरोबर आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने रत्नागिरीरेल्वेस्थानक सुशोभिकरण व नूतनीकरणाच्या कामाला रविवारी सायंकाळी जोरदार तडाखा दिला. सुदैवाने याठिकाणी कोणी प्रवासी नसल्याने कोणाला दुखापत झाली नाही. या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण दोन दिवसात होणार असून, त्याआधीच पीओपीचा काही भाग कोसळल्याचे समोर आले आहे.
रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्यात आहे. रविवारी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या दरम्यान वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली हाेती. या वादळी वाऱ्याचा सुशोभीकरणाच्या कामाला फटका बसला. छताला लावलेले पीओपीचे मोठे तुकडे वाऱ्याच्या वेगाबरोबर खाली लोंबकळून कोसळले. हे तुकडे खाली काेसळत असल्याचे पाहून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले हाेते.
प्रवाशांनी त्याठिकाणाहून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. जेथे छताचा भाग कोसळत होता तो भाग प्रवाशांना ये-जा करण्यास अद्याप खुला करण्यात आलेला नाही. मात्र, या भागात प्रवाशांची काही प्रमाणा ये-जा सुरु हाेती. त्यामुळे या धोकादायक भागात कुणी जाणार नाही याची दक्षता रेल्वे प्रशासनाकडून घेतली जात होती.
सुशाेभीकरण करण्यात आलेल्या रेल्वेस्थानकाचे दाेनच दिवसात लाेकार्पण हाेणार आहे. त्यापूर्वीच ही दुर्घटना घडल्याने कामाच्या दर्जाबाबत उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे.