मंडणगडची सत्ता जाणार महाविकास आघाडीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2022 18:23 IST2022-01-22T18:20:16+5:302022-01-22T18:23:55+5:30
दोघा अपक्षांनी राष्ट्रवादीच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याने मंडणगडची सत्ता महाविकास आघाडीच्या ताब्यात जाणार असल्याचे स्पष्ट

मंडणगडची सत्ता जाणार महाविकास आघाडीकडे
मंडणगड : येथील नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या चिन्हांवर निवडून आलेले सात नगरसेवक व राष्ट्रवादीचे समर्थक दोन अपक्ष अशा नऊ नगरसेवकांच्या उपस्थितीत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी या नावाचा गट स्थापन केला आहे. दोघा अपक्षांनी राष्ट्रवादीच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याने मंडणगडची सत्ता महाविकास आघाडीच्या ताब्यात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अस्पष्ट निकालामुळे मंडणगड नगरपंचायतीचे सत्ताकरणात पेच निर्माण झाला होता. आता शहर विकास आघाडीला उरलेल्या अपक्षाला सोबत घेत विरोधातच बसावे लागणार आहे.
निकालानंतर दोन दिवस सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या उलट सुलट चर्चांना शुक्रवारी राष्ट्रवादीच्या गट स्थापनेमुळे पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, रत्नागिरी येथे माजी आमदार संजय कदम, माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले नगरसेवक सुभाष सापटे, वैभव कोकाटे, मुकेश तलार, प्रियांका लेंडे, मनिषा हातमकर, समृद्धी शिगवण, राजेश्री सापटे यांच्यासह अपक्ष नगरसेविका ॲड. सोनल बेर्डे, रेश्मा मर्चंडे उपस्थित होत्या. यावेळी माजी जि. प. सदस्य प्रकाश शिगवण, माजी नगरसेवक दिनेश लेंडे, लुकमान चिखलकर, हरिष मर्चंडे, दिनेश सापटे, सतीश दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
गट स्थापन झाल्यामुळे मंडणगड नगरपंचायतीच्या सत्तेवर महाविकास आघाडीने शिक्कामोर्तब केले आहे. आरक्षणाप्रमाणे नगराध्यक्ष निवड केली जाणार आहे.