लोककला महोत्सवाच्या शोभायात्रेने अवघे चिपळूण दुमदुमले
By संदीप बांद्रे | Published: February 5, 2023 12:45 PM2023-02-05T12:45:46+5:302023-02-05T12:46:18+5:30
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर व आप्पासाहेब जाधव अपरांत संशोधन केंद्र यांच्या वतीने चिपळूण येथे रविवारपासून चार दिवस आयोजित करण्यात आलेल्या लोककला महोत्सवाला रविवारी शोभायात्रेने सुरुवात झाली.
चिपळूण:
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर व आप्पासाहेब जाधव अपरांत संशोधन केंद्र यांच्या वतीने चिपळूण येथे रविवारपासून चार दिवस आयोजित करण्यात आलेल्या लोककला महोत्सवाला रविवारी शोभायात्रेने सुरुवात झाली. ढोल-तश्याचा गजर, चालचित्रे व पारंपरिक वेशभूषेने नटलेल्या या शोभायात्रेने अवघे चिपळूण दुमदुमले. अनेकांनी उत्स्फूर्तपणे या शोभायात्रेत सहभाग घेतला.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे, साहित्यिक प्रकाश देशपांडे, लोकमान्य टिळक वाचनालयाचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे, लोककला महोत्सवाच्या नियोजन समितीचे प्रमुख प्रा. संतोष गोनबरे यांच्या उपस्थितीत नटराज पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ झाला. चिपळूण शहरातील जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टच्या सह्याद्री नगर या मैदानावर चार दिवस रंगणाऱ्या लोककला महोत्सवाला अभूतपूर्व उत्साहात सुरुवात झाली. यानिमित्त सकाळी ८.३० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी नटराज पूजन झाले. यावेळी बालकलाकार रुद्र बांडागळे याने हा लोककला महोत्सव यशस्वीपणे पार पडावा, यासाठी खास कोकणी पद्धतीने गाऱ्हाणे घातले. यानंतर भव्य शोभा यात्रेला सुरुवात झाली. या शोभायात्रेत लोककलांचे दर्शन घडलं. १२ बलुतेदार व अन्य चलचित्रे या शोभायात्रेत आकर्षण ठरली विद्यार्थ्यांसह विविध संस्था, नागरिक मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते. पराग ओक यांनी वराह अवतार, कालभैरव ढोल ताशा पथक नवा व जुना कालभैरव, शिरगाव येथील वारकरी पथक, विविध झेंडे पथक, कुंभार्ली येथील सर्वात उंच जोडे हेही या शोभायात्रेचे वैशिष्ट्य ठरले. सह्याद्री स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी १२ बलुतेदार साकारले होते. कापसाळे येथील चित्ररथ, रेडा, महाकाल बुवांची जाखडी, सारीपट्टा मर्दानी खेळ, सहेली ग्रुपचा चित्ररथ, कोकणामध्ये खास असलेला खालुबाजा, चित्ररथ, झांज पथक, ढोल पथक यामुळे ही शोभायात्रा नागरिकांसाठी खास ठरली.
शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूल, सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल पाग, परांजपे हायस्कूल, काळसेकर ज्युनिअर कॉलेज, ईकरा इंग्लिश मीडियम स्कूल, ख्रीस्त ज्योती कॉन्व्हेंट स्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, आनंदराव पवार महाविद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल सती, डीबीजे कॉलेज, बांदल हायस्कूल, एसपीएम भोगाळे, पाग कन्या शाळा असे विद्यार्थ्यांचे संच यामध्ये सहभागी झाले होते. सर्वधर्मांना एकत्र आणणारे व सर्व लोककलांचे एकत्रित दर्शन घडवणारी अशी ही अनोखी शोभायात्रा ठरली. या शोभा यात्रेचे सूत्रसंचालन प्रकाश गांधी यांनी केले. दिलीप आंब्रे, कैसर देसाई, शिवाजी शिंदे, धीरज वाटेकर, तुकाराम पाटील, मनीष दामले, राठोड आदींनी या शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.