कृषी विद्यापीठे पांढरा हत्ती नाही तर सोन्याची अंडी देणारी कोंबडी - कृषिमंत्री अब्दुल सत्तार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 12:59 PM2022-12-15T12:59:38+5:302022-12-15T13:00:09+5:30
कृषी विद्यापीठाने केलेल्या संशोधनाच्या जोरावर राज्याची उत्पादन क्षमता वाढली
दापोली : राज्यातील चारही कृषी विद्यापीठेशेतीला नवी दिशा देण्याचे काम करत आहेत. शास्त्रज्ञांनी वर्षानुवर्षे मेहनत घेऊन विकसित केलेल्या संशोधनामुळे राज्यातील कृषी क्षेत्राची भरभराट सुरू आहे. कृषी विद्यापीठे हा पांढरा हत्ती असल्याची टीका विरोधक करत असले तरी ती सोन्याचे अंडी देणारी कोंबडी असल्याचे मत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
दापोली येथे ५० वी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सयुंक्त कृषी संशोधन आणि विकास समिती परिषद बुधवारी सुरू झाली. या दोन दिवशीय परिषदेचे उद्घाटन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. यावेळी अपर मुख्य सचिव (कृषि) एकनाथ डवले, महाराष्ट्र कृषि शिक्षक व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इन्द्र मणी, अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख उपस्थित होते.
राज्याच्या विकासात कृषी विद्यापीठांचा मोलाचा वाटा असून, कृषी विद्यापीठाने केलेल्या संशोधनाच्या जोरावर राज्याची उत्पादन क्षमता वाढली आहे. तसेच कृषी विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांच्या हिताचे असून, शास्त्रज्ञांनी नवनवीन जाती, शेती अवजारे, सूक्ष्म सिंचन, कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित केल्यामुळेच शेतकऱ्यांची वाटचाल भरभराटीकडे सुरू आहे. कृषी विद्यापीठांशिवाय शेतकऱ्यांची प्रगती होऊ शकत नाही, असेही मंत्री सत्तार म्हणाले.
चारही कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून येथे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनात अवजारे, बी बियाणे प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या प्रत्येक स्टॉलची माहिती कृषिमंत्र्यांनी आवर्जून घेतली.