सार्वजनिक बांधकाम मंत्री आज पुन्हा करणार चिपळूण-आरवली महामार्गाची पाहणी
By संदीप बांद्रे | Published: September 12, 2023 12:26 PM2023-09-12T12:26:20+5:302023-09-12T12:27:34+5:30
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सध्या युद्धपातळीवर सुरू
चिपळूण : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मंगळवारी दुपारी चिपळूणमध्ये येत असून, ते चिपळूण ते आरवली महामार्ग चौपदरीकरण कामाची पाहणी करणार आहेत. त्याचबरोबर आरवली ते कांटे या येथील कामाचीही पाहणी करणार आहेत. गणेशोत्सवापूर्वी त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, पावसामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, चौपदरीकरणाची एक मार्गिका तरी डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्याअनुषंगाने बांधकाम मंत्री चव्हाण यांनी या प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले असून, गेले वर्षभरात त्यांनी तब्बल ८ वेळा कोकण दौरा करून कामाची पाहणी केली.
गणेशोत्सव काही दिवसावर आला आहे. या उत्सवासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर कोकणात येतात. परिणामी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक वाढते. त्यामुळे रस्ता सुस्थितीत असणे आवश्यक असते. त्यामुळे पुन्हा ते महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी मंगळवारी दाैरा करणार आहेत. सकाळी पनवेल येथून त्यांचा दौरा सुरू होणार आहे. पळस्पे ते इंदापूर येथून कामाची पाहणी करण्यास ते सुरुवात करणार आहेत.
कशेडी बोगदा तसेच परशुराम घाट येथे कामाची पाहणी केल्यानंतर दुपारी ते चिपळुणात दाखल होणार आहेत. याठिकाणी अधिकाऱ्यांशी चर्चा करून चिपळूण ते आरवली या २५ किलोमीटरच्या कामाची पाहणी करणार आहेत. चिपळूण ते आरवलीपर्यंत महामार्गाची एक मार्गिका बहुतांश पूर्ण झाली असली, तरी सावर्डे वहाळ फाटा तसेच आरवली या ठिकाणी अद्याप काॅंक्रिटीकरण बाकी आहे. तसेच रस्ता खड्डेमय झाला आहे. गणेशोत्सवापूर्वी त्याची किमान चांगली दुरुस्ती होणे आवश्यक आहे. चिपळूण ते आरवली मार्गाची पाहणी केल्यानंतर ते आरवली ते कांटे मार्गाची पाहणी करणार आहेत.