रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच आणणार, मंत्री नारायण राणे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 12:42 PM2024-01-29T12:42:22+5:302024-01-29T12:42:56+5:30
व्यवसाय प्रशिक्षण शिबिरे घेणार
चिपळूण : रिफायनरी होऊ देणार नाही म्हणणाऱ्यांची ताकद किती आहे, ती रोजच्या रोज आवळत चालली आहे. त्यामुळे त्यांनी सारखी चिव-चिव करू नये. हा प्रकल्प राबवल्याने जिल्ह्यातील लोकांचेच हित होणार आहे. येथील जनतेला मोठा रोजगार मिळणार आहे, लोकांचे दरडोई उत्पन्न वाढल्यास जिल्ह्याच्या विकासाला तसेच देशाच्या अर्थकारणालाही चालना मिळणार आहे. बेकारी दूर करण्याच्या प्रक्रियेत विरोधकांनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रतिपादन केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
खेड तालुक्यातील लोटे येथील श्री संत ज्ञानेश्वर माउली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थान गो-शाळेतर्फे ज्येष्ठ गोभक्त, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप पुणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त दि. २६ ते २८ जानेवारीदरम्यान राष्ट्रीय गो-संमेलन आयोजित केले आहे. संमेलनाच्या समारोपासाठी मंत्री नारायण राणे उपस्थित हाेते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मंत्री राणे यांनी सांगितले की, कोकणात अनेक शिकलेल्या तरुणांना नोकऱ्या हव्या आहेत. रिफायनरीच्या माध्यमातून तो पर्याय उपलब्ध होणार आहे. रिफायनरीसाठी पूरक असलेले अनेक मोठे उद्योगही येथे सुरू होणार आहेत. त्यामध्येही जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याचा कायापालट होईल.
व्यवसाय प्रशिक्षण शिबिरे घेणार
जिल्ह्यातील तरुणांनी विविध व्यवसाय सुरू करावेत. यासाठी येत्या काही दिवसांत लघू, मध्यम व अवजड उद्योग मंत्रालयातर्फे प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येणार आहे. या शिबिरात तरुणांना व्यवसायसंबंधी प्रशिक्षण दिले जाईल. त्यातून विविध उद्योग सुरू होण्यास चालना मिळेल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.
आरक्षणावर आज बोलणार
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे. मात्र, कोकणातील मराठा समाजात आरक्षणाच्या मागणीवरून दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. याविषयी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना विचारले असता उद्या, सोमवारी मुंबईत अधिकृतपणे भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.