रिफायनरी कोकणातच होणार, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 05:54 PM2022-12-08T17:54:24+5:302022-12-08T17:54:56+5:30
कोकणातील लोकांनी ज्यांना भरभरुन दिले, अशा लोकांनीच कोकणावर अन्याय केला
रत्नागिरी : केवळ भावना भडकवण्याचे राजकारण करणाऱ्या काही लोकांमुळे कोकण मागे राहिला आहे. त्यांच्यापासून कोकणी लोकांनी सावध राहिले पाहिजे. रिफायनरी प्रकल्प कोकणचे भवितव्य बदलू शकणारा असल्याने रिफायनरी कोकणातच होणार असल्याचे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रिफायनरीमुळे कोकणाला कोणताही धोका नसून, हा प्रकल्प कोकणातच होणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे.
मंगळवारी मुंबईमध्ये आयोजित स्वराज्य भूमी कोकण महोत्सव कार्यक्रमात राज्याच्या या दोन्ही प्रमुख नेत्यांनी रिफायनरी कोकणातच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गेले काही दिवस सुरू असलेल्या संभ्रमाला राज्य सरकारकडून पूर्णविरामच देण्यात आल्याचे मानले जात आहे.
या कोकण महोत्सवाला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार प्रवीण दरेकरही उपस्थित होते. निसर्गसंपन्नता असलेल्या काेकणाला आर्थिक संपन्नता आणण्यासाठी हा महोत्सव केला जात आहे. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार आणि स्वयंरोजगाराची मोठी संधी उपलब्ध आहे. आंबा, काजू आणि मत्स्य व्यवसाय यासह स्थानिक लोकांना रोजगार देअ शकतील, अशा उद्योगांना यापुढील काळात विशेष प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
कोकणात येऊ घातलेल्या रिफायनरीमुळे कोकणचे भवितव्य बदलून जाईल. मात्र या प्रकल्पाबाबत भाावनिक राजकारण केले जात आहे. त्यापासून कोकणी लोकांनी सावध राहायला हवे, असे ते म्हणाले. समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबई सिंधुदुर्ग हा महामार्ग असेल आणि हे सरकार कोकण विकासाला प्राधान्य देईल, असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात अप्रत्यक्षपणे ठाकरे शिवसेनेवर टीका केली. रिफायनरी प्रकल्पामुळे प्रदूषण होणार नाही. नाणारला रिफायनरी करण्याचा विषय झाला, तेव्हा प्रकल्पाला काही अटी घालण्यात आल्या होत्या. कोकणी जनतेची काळजी घेऊनच हा प्रकल्प होणार आहे. मात्र काही लोकांनी मतांचे राजकारण करण्यासाठी या प्रकल्पाला विरोध केला. हा प्रकल्प कोकणासाठी महत्त्वाचाच असल्याने तो कोकणातच उभारला जाईल, असे ते ठामपणे म्हणाले.
सरकार बळ देईल
निसर्गाच्या लहरीपणामुळे, हवामानातील सततच्या बदलांमुळे कोकणातील अनेक क्षेत्रांना सध्या नुकसान सोसावे लागत आहे. त्याची दखल घेऊन त्यांना सरकार बळ देईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
कोकणाने भरभरुन दिले त्यांनीच अन्याय केला
कोकणातील लोकांनी ज्यांना भरभरुन दिले, अशा लोकांनीच कोकणावर अन्याय केला आहे, असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला आणि हा प्रकल्प कोकणातच उभारणार याचा पुनरुच्चार त्यांनी केला