परशुराम घाटातील पाषाणाला पान्हा फुटता फुटेना!, कामात मोठा अडथळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 04:47 PM2023-04-29T16:47:41+5:302023-04-29T16:48:27+5:30

कातळ फोडण्याचे काम चाेवीस तास ब्रेकरच्या सहाय्याने सुरू आहे

The rock in Parashuram Ghat is not breaking apart, a big obstacle in the work | परशुराम घाटातील पाषाणाला पान्हा फुटता फुटेना!, कामात मोठा अडथळा 

परशुराम घाटातील पाषाणाला पान्हा फुटता फुटेना!, कामात मोठा अडथळा 

googlenewsNext

चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाच्या कामाची लगीनघाई सुरू झाली आहे. मात्र, घाटाच्या मध्यभागी असलेल्या कातळाचा या कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. कातळ फोडण्याचे काम चाेवीस तास ब्रेकरच्या सहाय्याने सुरू आहे. परंतु, अतिशय कठीण असलेले हे कातळ फुटता फुटत नसल्याने तेथे तात्पुरत्या स्थितीत बायपास तयार करण्याचे नियोजन ठेकेदार कंपनीकडून केले जात आहे.

गेली अनेक वर्षे परशुराम घाटातील चौपदरीकरण विविध कारणांमुळे रखडले होते. सध्या घाटात दोन्ही बाजूने संरक्षक भिंत उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, खेड हद्दीतील कल्याण टोलवेज कंपनीमार्फत सुरू असलेले काम एका अवघड वळणावर येऊन थांबले आहे. याठिकाणी २२ मीटरहून अधिक उंच दरडीचा भाग असल्याने व तेथे कठीण कातळ लागल्याने कामाचा वेग कमी झाला आहे.

काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपल्याने त्या आधी घाटात चौपदरीकरणातील एकेरी मार्ग सुरू करण्यावर भर दिला जात आहे. त्याप्रमाणे कामाला गती मिळण्यासाठी २५ एप्रिलपासून दुपारी १२ ते सायंकाळी ५ दरम्यान घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. चिरणी - लोटे या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. या कालावधीत परशुराम घाटातील जुन्या मार्गावर भराव करून काॅंक्रीटीकरणाचे कामही तातडीने हाती घेण्याचे नियोजन केले आहे.

त्यासाठी मागील तीन दिवस सातत्याने भरावाचे काम सुरू आहे. घाटात मध्यवर्ती ठिकाणी असलेला कातळ दोन ब्रेकरच्या सहाय्याने फोडण्याचेही काम सुरू आहे. कातळ फोडण्यासाठी सुरूंग लावण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु,  घाटमाथ्यावर लोकवस्ती असल्याने त्याला अद्याप परवानगी मिळालेली नाही. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यासाठी आलेल्या वेगाला कातळाने ब्रेक लावला आहे.

परशुराम घाटाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला कातळ अतिशय कठीण स्वरूपाचा आहे. ब्रेकरनेही तुटता तुटेना, अशी परिस्थिती आहे. तूर्तास पावसाळ्यापूर्वी वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने बाजूचा मऊ खडक तोडून कातळाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्थितीत बायपास रस्ता तयार केला जात आहे. बायपास रस्त्यावरून वाहतूक सुरळीत सुरू झाली की, कातळ फोडण्याचे काम केले जाणार आहे.  - शिवाजी कांबळे, अभियंता, कल्याण टोलेवेज कंपनी

Web Title: The rock in Parashuram Ghat is not breaking apart, a big obstacle in the work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.