Ratnagiri: वर्ग सुटला अन् शाळेचे छप्पर कोसळले, सुदैवाने २८ विद्यार्थी वाचले; शिरवली येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 02:32 PM2024-06-26T14:32:13+5:302024-06-26T14:35:29+5:30

दुर्घटनेनंतर पालकांनी खेडच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले

The roof collapsed of a primary school classroom at Shirvali in Ratnagiri district | Ratnagiri: वर्ग सुटला अन् शाळेचे छप्पर कोसळले, सुदैवाने २८ विद्यार्थी वाचले; शिरवली येथील घटना

Ratnagiri: वर्ग सुटला अन् शाळेचे छप्पर कोसळले, सुदैवाने २८ विद्यार्थी वाचले; शिरवली येथील घटना

खेड (जि. रत्नागिरी) : गेले दोन दिवस काेसळणाऱ्या संततधार पावसामुळे शिरवली (ता. खेड) येथील प्राथमिक शाळेच्या एका वर्गखोलीचे काैलारू छप्पर सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोसळले. सुदैवाने शाळा सुटल्यानंतर ही दुर्घटना घडल्याने शाळेतील २८ विद्यार्थी वाचले आहेत. अन्यथा माेठी दुर्घटना घडली असती.

शिरवली येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा १९५४ मध्ये बांधण्यात आली आहे. या शाळेत पहिली ते सातवीचे वर्ग असून, २८ पटसंख्या आहे. या शाळेला सत्तर वर्षे होऊनही शाळेच्या दुरुस्तीसाठी कोणत्याही प्रकारचा निधी खर्च पडलेला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शाळेच्या दुरुस्तीबाबत ग्रामस्थांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही शाळेच्या दुरुस्तीकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे नादुरुस्त शाळेच्या वर्गखाेलीचे छप्पर सोमवारी मुसळधार पावसात काेसळले. सुदैवाने वर्गात विद्यार्थी नसल्याने काेणालाही दुखापत झालेली नाही.

या दुर्घटनेनंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मंगळवारी खेडच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. शाळेच्या इमारतीचे उर्वरित छतही मुसळधार पावसात केव्हाही पडू शकते, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता जोपर्यंत विद्यार्थ्यांना सुरक्षित पर्याय व्यवस्था होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना त्या शाळेत पाठवले जाणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून ही शाळा मोडकळीच आल्याबाबतचे पत्र ग्रामस्थांकडून गटशिक्षणाधिकारी यांना दिले जात आहे. मात्र, दुरुस्तीच्या कामासाठीही शासनाकडून निधी न आल्यामुळे दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळेच ही दुर्घटना घडली आहे. योग्यवेळी दुरुस्ती देखभाल झाली असती तर आज हे छप्पर काेसळले नसते. - वसंत गुरव, माजी सरपंच, शिरवली.

Web Title: The roof collapsed of a primary school classroom at Shirvali in Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.