मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीतील दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीस खुला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 03:26 PM2024-09-05T15:26:48+5:302024-09-05T15:27:13+5:30
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या घाटातील दुसरा बोगदा गुरुवार, ५ सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. ...
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या घाटातील दुसरा बोगदा गुरुवार, ५ सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गाच्या पाहणीदरम्यान ३ सप्टेंबरपूर्वी हा बोगदा वाहतुकीस खुला करून चाकरमानी दोन्ही बोगद्यातून मार्गस्थ होतील, असे जाहीर केले होते. मात्र, ढिम्म प्रशासन व ठेकेदाराने मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल ठरवले आहे. त्यानंतर दोन दिवसांनी का होईना, आता गुरुवारपासून दोन्ही बोगद्यांतून वाहतुकीसाठी खुला होत आहे.
मुंबईकडून गोव्याच्या दिशेने वाहतूक करण्यासाठी तयार करण्यात येणारा हा कशेडी बोगदा गणेशोत्सव कालावधीत मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी वापरण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गणेशोत्सव कालावधीत या बोगद्यातील तीन मार्गिकांपैकी एक मार्गिका सुरू करण्यात येणार आहे. या दृष्टीने ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी अपूर्ण कामांच्या पूर्ततेसाठी धावपळ सुरू केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे फाट्यापासून कशेडी घाटापर्यंतच्या रखडलेल्या कामांसह खड्ड्यात गेलेल्या मार्गामुळे गणेशभक्तांना यंदाही जीवघेणा प्रवास करावा लागणार होता. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी या मार्गाची पाहणी करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. ३ सप्टेंबरपूर्वी महामार्ग सुस्थितीत आणण्याचे निर्देश दिले होते. सद्य:स्थितीत दुसऱ्या बोगद्याच्या उर्वरित दोन अंतर्गत मार्गिका अपूर्ण असून एकाच मार्गिकेचा वापर वाहतुकीसाठी होणार आहे. दरम्यान या बोगद्याला जोडणाऱ्या मार्गाचे काम अर्धवट असून खेड दिशेकडील मार्गांवर पुलांचे कामही अपूर्ण आहे. गणेशोत्सवासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्यामुळे महामार्गावरील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.