रत्नागिरीतील दापोलीत शिंदे गट आणि भाजप युतीने लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 05:36 PM2022-12-08T17:36:17+5:302022-12-08T17:37:51+5:30
'सगळी कटुता संपुष्टात आणून शिवसेना भाजप पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते एकत्र येण्याचा निर्णय'
दापोली : ग्रामपंचायत निवडणुकांसह येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना व भाजप एकत्र लढणार असल्याची मोठी घोषणा शिंदे गटाचे आमदार योगेश कदम व भाजपचे उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष केदार साठे यांनी दापोलीत संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
दापोली विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना भाजपा प्रत्येक निवडणुका एकत्रित लढेल, अशी घोषणाही आमदार योगेश कदम यांनी केली. ते पुढे म्हणाले की, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या निवडणुका आम्ही एकत्र लढण्याची सकारात्मक भूमिका घेऊन पुढे जात आहोत. याचे सकारात्मक परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीनंतर रत्नागिरी जिल्ह्यात दिसतील.
पालकमंत्री उदय सामंत यांच्याबरोबरही यासंदर्भात दहा दिवसांपूर्वी बैठक झाली. आमदार योगेश कदम यांच्याबरोबरही बैठक झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही आम्हाला तसा संदेश दिला असल्याने गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वच निवडणुका भविष्यात एकत्र लढू. एकत्रित लढल्याने निकालानंतर बाळासाहेबांची शिवसेना व भाजप या युतीच्या विजयाची घोडदौड बघायला मिळेल, असे केदार साठे यांनी सांगितले.
मागच्या अडीच वर्षात दापोली विधानसभा मतदारसंघाबाबत अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. आम्ही आता मागची सगळी कटुता संपुष्टात आणून शिवसेना भाजप पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही दडपणाखाली आम्ही हा निर्णय घेतला नसल्याचेही आमदार योगेश कदम यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, सुधीर कालेकर, भगवान घाडगे, उन्मेष राजे, मोहन शिगवण, नीलेश शेठ, पप्पू रेळेकर, स्वप्नील पारकर, दीप्ती निखार्गे, चारुता कामतेकर, कीर्ती परांजपे, भाजपचे लहू साळुंखे, संजय सावंत, नगरसेविका जया साळवी, अजय साळवी, संदीप केळकर, स्वरुप महाजन यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते