प्रकल्पांना विरोध अन् नोकरीसाठी ओरड; कोकणातील स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 07:08 PM2024-11-07T19:08:57+5:302024-11-07T19:10:04+5:30
नोकरी देण्याच्या घोषणांचा पाऊस, पण येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध
रत्नागिरी : मतांच्या राजकारणासाठी येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करायचा आणि निवडणुकीच्या काळात रोजगाराच्या नावाने ओरड करायची, अशी स्थिती कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत गेली अनेक वर्षे कायम आहे. एका पक्षाने प्रकल्प आणला की दुसऱ्याने तो घालवायचा, या प्रकारामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील स्थलांतर वर्षानुवर्षे कायम आहे. रत्नागिरीत नुकत्याच झालेल्या प्रचार सभेत उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार आल्यास रोजगार देण्याचा नारा देतानाच बारसू रिफायनरी हद्दपार करण्याची घोषणाही केली.
वर्षानुवर्षे कोकण केवळ पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकसाठीची बाजारपेठ बनून राहिला आहे. भाजीपाला, दूध, अन्नधान्य या रोजच्या वापराच्या आणि म्हणून सर्वाधिक खपाच्या गोष्टी पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येतात. किमान भाजीपाला आणि दूध यासाठी काेकण स्वयंपूर्ण करण्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने कधीही भर दिलेला नाही. त्यामुळेच वर्षानुवर्षे पोटापाण्यासाठी कोकणी लोकांनी मुंबई गाठली. आता लोक केवळ नोकरीसाठी बाहेर पडत नाहीत तर त्याआधी उच्च शिक्षणासाठीच बाहेर पडतात. उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत नोकऱ्या उपलब्ध नाहीत. म्हणून ते कायमच जिल्ह्याबाहेर राहतात.
दरवेळी निवडणुका आल्यानंतर तरुणांच्या हाताला काम, रोजगार, प्रकल्प, पर्यटनातून विकास अशा गोष्टींवर उहापोह केला जातो. आम्ही अमुक करू, तमुक करू म्हणून घोषणा केल्या जातात. मात्र, वर्षानुवर्षे यात काहीच फरक पडलेला नाही. कोकण आहे तसाच राहिला आहे. कोकणाबाहेर राहणारे लोक कोकण असाच निसर्गसंपन्न राहू दे म्हणून इथल्या प्रकल्पांना विरोध करतात. पण प्रत्यक्षात कोकणातून कामासाठी बाहेर जाणाऱ्या तरुणांचा विचारच केला जात नाही.
गेली अनेक वर्षे कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध केला गेला आहे. सिंधुदुर्गातील सी वर्ल्ड असो किंवा नाणारची रिफायनरी असो, रेडीमधील बंदर विकास असो किंवा राजापुरातील डॉकयार्ड असो, नव्याने येणारी एमआयडीसी असो किंवा मायक्रो चीपचा कारखाना असो प्रत्येक प्रकल्पाला विरोध केला गेला आहे. याविरोधात राजकारणच अधिक झाले आहे. एखादा प्रकल्प जनहिताचा असेल तर त्याबाबत जनजागृती करण्यावर कोणाचाही भर नसतो. लोकांना हवंय ते, अशा नावाखाली प्रकल्पांना विरोध होतच राहतो.
जिल्ह्यात महिला मतदार अधिक का?
राज्यात सर्वाधिक महिला मतदार रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. सिंधुदुर्गातही पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिक आहेत. यामागचे कारण कोणी विचारात घेत नाही. कोकणात मुलींचा जन्मदर चांगला आहे, ही बाब खरी असली तरी येथील पुरुष मोठ्या प्रमाणात नोकरीसाठी परजिल्ह्यात आहेत, हेदेखील त्याचे महत्त्वाचे कारण आहे. पण प्रत्येक प्रकल्पाला विरोध झाला तर कोकणातील तरुणांनी इथे राहून करायचे तरी काय?