मुस्लिम समाजाविरोधात आमदार नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेधच - रमेश कदम
By संदीप बांद्रे | Published: December 14, 2023 04:14 PM2023-12-14T16:14:01+5:302023-12-14T16:15:31+5:30
..तर ते देशाला आणि लोकशाहीला घातक ठरेल
चिपळूण : आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाविरोधात केलेले वक्तव्य गंभीर आणि भयंकर आहे. समाजात दुफळी निर्माण करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे आम्ही नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत असून त्यांच्या पक्षाने व नेत्यांनी त्यांना समज देऊन रोखले पाहिजे, तसेच सरकारने देखील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते व माजी आमदार रमेश कदम यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल केला.
कदम पुढे म्हणाले की, पिढ्यानपिढ्या मुस्लिम समाज येथे शांततेत आणि एकोप्याने राहत आहे. कोकणाला आणि महाराष्ट्राला तर हिंदू-मुस्लिम ऐक्याची एक मोठी परंपरा आहे. मग आमदार नितेश राणेंना गरळ ओकण्याची गरजच काय, नेमके त्यांना काय साद्य करायचे आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
मुस्लिम समाज रस्त्यावर आला तर परत जाणार नाही, हे राणेंचे वक्तव्य म्हणजे धमकी नव्हे का, खुलेआम ते असे धमक्या देत असतील तर सरकारने त्यांच्यावर कारवाई करायला हवी. पण सरकारने कोणतीच दखल घेतलेली नाही. त्यांचा पक्ष व पक्ष नेते देखील याबाबत बोलत नाहीत. याचा अर्थ काय, भाजप आणि सरकार त्यांना पाठीशी घालून अशा वक्तव्यांचे समर्थन तर करत नाही ना, असा गंभीर आरोप देखील माजी आमदार कदम यांनी केला. असे वक्तव्य जर सातत्याने होत राहिले, तर ते देशाला आणि लोकशाहीला घातक ठरेल. मुस्लिम समाजच नव्हे तर कोणत्याही समाजाच्या बाबतीत असे वक्तव्य होऊ नये.
..तर गीतेंना पाठिंबा
अनंत गीतेंच्या उमेदवारी बाबत छेडले असता रमेश कदम म्हणाले, राजकारणात काम करत असताना व्यक्ती मोठी नसते तर पक्ष मोठा असतो. त्यामुळे पक्षाने एखादा निर्णय घेतला तर कार्यकर्ता म्हणून त्याचे पालन हे केलेच पाहिजे. आम्ही महाविकास आघाडीत आहोत. त्यामुळे आघाडी तर्फे जर लोकसभेची उमेदवारी अनंत गीतेंना मिळाली तर निश्चितपणे मी त्यांच्या प्रचारासाठी संपूर्ण मतदारसंघात फिरेन. मी देखील रायगड मतदारसंघात निवडणूक लढवलेली आहे. त्यामुळे अनंत गीतेंना त्याचा फायदा होईल असेही ते म्हणाले.
पक्षादेशाचे पालन करू
चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाबाबत देखील रमेश कदमांनी उघडपणे मत व्यक्त केले. या मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. ती आमच्याकडेच असावी असा आमचा आग्रह असेलच. पण पक्ष नेतृत्वाने जर ही जागा अन्य पक्षाला दिली आणि तसा आदेश आला, तर निश्चितपणे पक्षाच्या आदेशाचे पालन करून त्या उमेदवाराला निवडून आणू. या जागेच्या बदल्यात कोणती जागा घ्यावी हा निर्णय सर्वस्वी शरद पवार यांचाच असेल, अशा शब्दात त्यांनी भूमिका जाहीर केली.
तो आघाडीचा फराळ गोडच होता
दिवाळीत रमेश कदम आमदार भास्कर जाधव यांच्या घरी फराळासाठी गेले होते. पत्रकारांनी याबाबत छेडले असता रमेश कदम म्हणाले, तो महाविकास आघाडीचा फराळ होता. त्यामुळे तो गोडच होता. राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. आमची आघाडी आहे. त्यामुळे एकत्र आलो.