Ratnagiri news: सार्थक म्हणाला ‘साहेब, माझा बस पास हरवलाय, तक्रार द्यायची आहे’; विद्यार्थ्याचे केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 06:52 PM2023-03-18T18:52:02+5:302023-03-18T18:54:35+5:30

पोलिसांनी अवघ्या पाच मिनिटांत एसटी पास हरवल्याचा दाखलाही त्याला तयार करुन दिला

The student lodged a complaint with the police as he lost his ST pass in Chiplun Ratnagiri | Ratnagiri news: सार्थक म्हणाला ‘साहेब, माझा बस पास हरवलाय, तक्रार द्यायची आहे’; विद्यार्थ्याचे केले कौतुक

Ratnagiri news: सार्थक म्हणाला ‘साहेब, माझा बस पास हरवलाय, तक्रार द्यायची आहे’; विद्यार्थ्याचे केले कौतुक

googlenewsNext

संदीप बांद्रे

चिपळूण : पोलिस स्थानकात जायचे म्हटल्यावर मोठ्या माणसांनाही घाम फुटतो; पण जेव्हा तेरा वर्षांचा चिमुरडा पोलिस स्थानकात जाऊन आपला बस पास हरवल्याची तक्रार करतो, तेव्हा ही गोष्ट कौतुकास्पद वाटते. चिपळूणच्या कापसाळ येथील सार्थक संजय जमदाडे याने हे धाडस केलं. एसटीचा पास हरवला म्हणून शुक्रवारी दुपारी तो तक्रार देण्यासाठी थेट पोलिस स्थानकात पोहोचला. अर्थात त्याच्या या वागण्याचे कौतुक वाटलेल्या पोलिसांनी अवघ्या पाच मिनिटांत एसटी पास हरवल्याचा दाखलाही त्याला तयार करुन दिला.

पोलिस म्हणजे हातात काठी, करडा आवाज अशी प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. त्याविषयी लहान मुलांमध्ये प्रचंड भीती असते. बरीच मुलं रडलं किंवा एखादा हट्ट धरला, तर पालक पोलिसांचे नाव घेऊन वेळ मारून नेतात; परंतु या गोष्टीचा मुलांच्या मनावर लहानपणापासूनच परिणाम होतो. त्यातून पोलिसांविषयी भीती निर्माण होते. ही भीती आयुष्यभर राहते. त्यामुळे पोलिस स्थानकात जाऊन तक्रार देणे सोडा, अनेकजण पोलिस स्थानकात जाणेही टाळतात; परंतु नागरिकांनी आपल्या समस्या घेऊन कोणतीही भीती न बाळगता पोलिसांपर्यंत यावे, यासाठी पोलिस प्रशासन विविध उपक्रम राबवत आहे. त्याचे चांगले परिणाम आता हळूहळू होताना दिसत आहेत.

शुक्रवारची घटनाही अशीच काहीशी होती. चिपळूण शहरालगतच्या कापसाळ येथील रहिवासी असलेल्या सार्थक संजय जमदाडे या १३ वर्षीय विद्यार्थ्याचा एसटी पास हरवला. त्यामुळे गडबडलेल्या सार्थकने थेट पोलिस स्थानक गाठले. पोलिस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर गेल्यानंतर मात्र तो गोंधळला. नेमके काय करावे हेच त्याला कळेनासे झाले. तेवढ्यात तो पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या नजरेस पडला. त्यांनी जवळ बोलावून विचारपूस केली. तेव्हा त्याने घाबरत घाबरत माझा एसटी पास हरवला आहे. मला तक्रार द्यायची आहे, असे सांगितले.

तेव्हा शिंदे यांनी त्या चिमुरड्याला आपल्या कक्षात नेले आणि ठाणे अंमलदारांना बोलावून घेत अवघ्या पाच मिनिटांत त्याला एसटी पास हरवल्याचा दाखला दिला. त्यानंतर त्याला नवीन पास मिळवण्याची प्रक्रिया सांगितली. त्याचवेळी सार्थकचे कौतुक करत कोणीही न डगमगता पोलिसांची मदत घ्यावी, हेच आमचे ध्येय असल्याचा संदेश सोशल मीडियावरून दिला.

पोलिसांविषयी भीती मुळीच असता कामा नये. भीती आदरयुक्त असायला हवी. त्यासाठी पोलीस व नागरीक यांच्याच संवाद होण्याची गरज आहे. त्याच ध्येयाने आम्ही काम करीत आहोत. त्यामुळे या विध्यार्थ्याने कौतुक करावेसे वाटले. त्यातून आम्ही आमच्या प्रयत्नात यशस्वी होत असल्याची जाणीवही झाली. -रवींद्र शिंदे, पोलिस निरीक्षक, चिपळूण.

Web Title: The student lodged a complaint with the police as he lost his ST pass in Chiplun Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.