सर्वेक्षणामुळे चिपळुणात कर बुडवणारे हाेणार उघड, शहरात चार पथके नेमली
By संदीप बांद्रे | Published: May 8, 2023 05:07 PM2023-05-08T17:07:12+5:302023-05-08T17:08:23+5:30
एका क्लिकवर संपूर्ण शहराची माहिती मिळणार
चिपळूण : शहरातील मालमत्तांचे दर चार वर्षानी सर्वेक्षण करून कराची आकारणी केली जाते. यावर्षी सर्वेक्षणासाठी स्थापत्य कन्सल्टन्सी या कंपनीने शहरात चार पथके नेमली आहेत. त्यांच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकांची मोजणी केली जात आहे. मालमत्तांसह शहरातील मोकळ्या जागांचीही नोंद या सर्वेक्षणात ठेवली जाणार आहे. त्यामुळे कर बुडवणारे या सर्वेक्षणामुळे उघड होणार आहेत.
काेराेनामुळे हे सर्वेक्षण थांबले हाेते. यावर्षी शहरात सर्वेक्षण सुरू केले असून या एजन्सीचे सुमारे २०० तर नगर परिषदेचे ३० कर्मचारी काम करत आहेत. मोजणीसाठी ड्रोन व इतर अत्याधुनिक यंत्रांची मदत घेतली आहे. संपूर्ण शहराच्या सर्वेक्षणासाठी दोन महिने लागणार आहेत. त्यानंतर मात्र एका क्लिकवर संपूर्ण शहराची माहिती मिळणार आहे. या सर्वेक्षणामुळे सध्याच्या मालमत्तांचे खरे क्षेत्र, त्यात भाडेकरू आहेत की मालकच राहतात याची माहितीही मिळणार आहे.
सर्वेक्षणामुळे सध्या मालमत्ता कर वसुली थांबवण्यात आली असून, केवळ पाणीपट्टी वसुली सुरू आहे. नगर परिषदेकडे शहराची माहिती असली तरी ती अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घरोघर व शहरभर फिरून घेतलेली आहे. त्यामुळे त्यात काही त्रुटीही आहेत. मात्र, या थ्रीडी सर्वेक्षणामुळे अचूक माहिती मिळणार आहे.