‘त्या’ मुलीचा इतका लळा लागलाय आमचा पायच निघत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 12:58 PM2022-01-31T12:58:26+5:302022-01-31T12:59:35+5:30
पांगरी येथील पऱ्याजवळील एका जंगलमय भागात चार दिवस थंडीत कुडकुडत निपचित पडलेली आढळली. तिची अवस्था पाहून साऱ्यांच्याच डाेळ्यात पाणी आले हाेते.
अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : जंगलमय भागात चार दिवस थंडीत राहिलेल्या त्या मुलीकडे पाहिल्यानंतर मन सुन्न झाले. तिची ती अवस्था पाहून तिला उचलून घेण्याचेही धाडस हाेत नव्हते. आता तिची तब्बेतही सुधारली आहे. या मुलीचा आता इतका लळा लागला आहे की, तिच्या जवळून पायच निघत नाही, असे भावूक उद्गार रुग्णालयात तिची काळजी घेणारे पांगरी येथील ग्रामसेवक अखिलेश गमरे यांनी व्यक्त केले.
संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथील पऱ्याजवळील एका जंगलमय भागात २५ जानेवारी राेजी दीड वर्षाची मुलगी चार दिवस थंडीत कुडकुडत निपचित पडलेली आढळली. तिची अवस्था पाहून साऱ्यांच्याच डाेळ्यात पाणी आले हाेते.
अखिलेश गमरे यांनी ग्रामस्थांसह खासगी वाहनाने तिला घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालय गाठले. या मुलीचे नाव अनुश्री असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अखिलेश यांनी तिच्याजवळ थांबण्याची जबाबदारी स्वीकारली. रत्नागिरीतील कुवारबाव येथे अखिलेश हे पत्नी आणि आईसाेबत राहतात.
मुलीला भेटण्यासाठी अनेकजण येत असल्याने तिला अजूनही अतिदक्षता विभागातच ठेवण्यात आले आहे. तिला उपचारासाठी दाखल केल्यापासून अखिलेश आणि त्यांची पत्नी इरा त्या मुलीजवळ सकाळपासून थांबलेले असतात. रात्री १२-१२.३० वाजता ती झाेपल्यानंतर दाेघे घरी जातात. तिला जेवण देणे, तिला जे हवे ते बघण्याचे काम दाेघे करतात. पाेटच्या मुलीसारखी ते दाेघे तिची काळजी घेतात.
अखिलेश यांनी सांगितले की, माझ्या कार्यालयाने मला समजून घेतल्यानेच मुलीजवळ थांबणे शक्य झाले. आम्हाला आता तिचा इतका लळा लागला आहे की, तिच्याजवळून पायच निघत नाही. तिही आम्ही आल्याशिवाय जेवत नाही, असे अखिलेश यांनी सांगितले.
प्रेम मिळालेच नाही
या चिमुकलीला प्रेम कधी मिळालेच नाही. तिला घरात एकटीला ठेवून सगळे बाहेर जात हाेते. रुग्णालयातील साऱ्यांच्या प्रेमाने ती आनंदून गेली आहे. तिलाही सर्वांची आता सवय झाली आहे.
काेणताच त्रास नाही
या मुलीचा काेणताही त्रास नाही. अतिदक्षता विभागातील शांतता तिने कधीच भंग केली नाही. ती कधी रडली नाही. हाता-पायावर सलाईनच्या सुया टाेचल्या तरीही तिच्या ताेंडातून रडणे आलेले नाही. स्वत:च्या हाताने जेवते, रुमालाची घडीही अगदी व्यवस्थित करते.
मुलीला रुग्णालयात आणले त्यावेळी तिची प्रकृती चिंताजनक हाेती. ती बेशुद्ध हाेती, मानसिक धक्का बसला हाेता. तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. बालराेगतज्ज्ञ डाॅ. राेहित पाटील यांच्यासह डाॅ. अभिषेक पाटील यांनी उपचार केले. ती बरी झाल्याचे पाहून खूप समाधान वाटते. - डाॅ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी