ब्रेक निकामी झाल्याने ट्रकची कारला धडक, तिघे जागीच ठार, लांजातील आंजणारी पुलावरील दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 11:40 AM2022-06-06T11:40:27+5:302022-06-06T11:42:06+5:30

अपघातानंतर दोन्ही वाहने पुलावरून खाली कोसळली

The truck hit the car due to brake failure Three killed, Accident on the Anjani bridge in Lanja | ब्रेक निकामी झाल्याने ट्रकची कारला धडक, तिघे जागीच ठार, लांजातील आंजणारी पुलावरील दुर्घटना

ब्रेक निकामी झाल्याने ट्रकची कारला धडक, तिघे जागीच ठार, लांजातील आंजणारी पुलावरील दुर्घटना

googlenewsNext

लांजा : सिमेंट घेऊन लांजाहून रत्नागिरीच्या दिशेने जाताना ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने इर्टिगा कारला ट्रकची धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहने आंजणारी पुलावरून खाली कोसळली. या अपघातात ट्रक चालकासह कारमधील दोघेजण अशा एकूण तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत ट्रक चालक हा लांजा तालुक्यातील पुनस येथील असून, कारमधील चिपळूण येथील रहिवासी आहेत. हा अपघात काल, रविवारी रात्रीच्या सुमारास घडला.

ट्रक चालक विजय सावंत, कार चालक समीर प्रदीप शिंदे आणि त्यांची आई सुहासिनी प्रदीप शिंदे (वय ६१) यांचा जागीच मृत्यू झाला. तर समीर यांच्या पत्नी समृद्धी शिंदे (२९) आणि वडील प्रदीप हिम्मतराव शिंदे (६५) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

चिपळूण येथील रहिवाशी असलेले शिंदे कुटुंबीय काल, रविवारी रात्री मालवण येथून चिपळूणकडे चालले होते. तर ट्रक चालक विजय विलास सावंत हे आपल्या ताब्यातील ट्रकमधून सिमेंट घेऊन रत्नागिरी येथून लांजाकडे येत होते. आंजणारी घाट उतरत असताना ट्रक चालक सावंत यांना ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आले. आंजणारी वरचा स्टॉप या ठिकाणच्या तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाले.

याच दरम्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात आराम बसची रहदारी असल्याने ट्रक थांबवणे आव्हान बनले. त्यांनी मोठ्या शिताफीने ट्रक आंजाणारी पुलापर्यंत आणला. मात्र, सिमेंट भरलेले असल्याने आणि तीव्र उतार असल्याने या ठिकाणी समोर आलेल्या इर्टिगा कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहने पुलावरून खाली कोसळली. यात ट्रक चालक विजय सावंत, कार चालक समीर शिंदे आणि त्यांची आई सुहासिनी शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. तर समीर शिंदे यांच्या पत्नी समृद्धी आणि वडील प्रदीप हिम्मतराव शिंदे हे दोघे गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर जखमी तसेच मृत प्रवाशांना लांजा पोलीस व ग्रामस्थांनी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जखमी प्रवाशांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे.

Web Title: The truck hit the car due to brake failure Three killed, Accident on the Anjani bridge in Lanja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.