भाेस्ते घाटातील वळण जीवघेणे; चाैपदरीकरणानंतरही धाेकादायक वळण तसेच, अनेक अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 04:23 PM2022-06-07T16:23:01+5:302022-06-07T16:23:42+5:30
कोकणात येण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाट आणि परशुराम घाट हे दोन घाट अत्यंत महत्त्वाचे आहेत.
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील भोस्ते घाट चौपदरीकरणानंतर वाहतुकीला सुलभ झाला असला तरी एक तीव्र उतार असलेले नागमोडी वळण मात्र वाहनचालकांना डोकेदुखी ठरले आहे. गोव्यातून मुंबईच्या दिशेने घाट उतरताना अवजड वाहनांचे या वळणावर चौपदरीकरण काम झाल्यावर अनेकदा अपघात झाले आहेत. तीव्र उतार व यू इंग्रजी आकाराचे हे वळण माल वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या अनुभवी चालकांना धोकादायक ठरले आहे.
भोस्ते घाटातील चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, घाटाच्या बाजूला केलेल्या डोंगर कटाईमुळे गेल्यावर्षी तब्बल पाचवेळा भूस्खलन होऊन महामार्गाची एक बाजू पूर्णपणे ठप्प झाली होती. या घाटात काही ठिकाणी दरड कापण्याचे काम सुरू केले होते.
मात्र, ते सद्य:स्थितीत बंद आहे. या घाटात ट्रक टर्मिनल तयार करण्याचे कामही सुरू आहे. मात्र, भोस्ते घाटातील धोकादायक आणि संभाव्य दरड प्रवण क्षेत्रातील दरड अजूनही हटविण्यात आली नाही. तसेच भोस्ते घाटातील अवघड वळणावर सतत होणाऱ्या अपघातांवरही अद्यापही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे घाटातील प्रवास अजूनही सुकर झालेला नाही. पावसाळ्यात जपूनच प्रवास करावा लागणार आहे.
कोकणात येण्यासाठी मुंबई - गोवा महामार्गावरील भोस्ते घाट आणि परशुराम घाट हे दोन घाट अत्यंत महत्त्वाचे आहेत. दुर्दैवाने पावसाळ्यात या घाटात दुर्घटना घडल्यास पर्यटनावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रशासनाने या घाटाला असणारा पर्यायी मार्ग दुरुस्त करून वाहतुकीसाठी सक्षम करून मार्ग तयार ठेवण्याची मागणी हाेत आहे.