प्रचाराचा कडाका अन् उन्हाचा तडाखा; पाण्यासाठी खर्च होतोय पाण्यासारखा पैसा

By मनोज मुळ्ये | Published: April 30, 2024 05:13 PM2024-04-30T17:13:54+5:302024-04-30T17:14:37+5:30

कमीत कमी २० ते २५ लाख रुपयांची उलाढाल वाढली

the use of water bottles is high due to the heat In campaigning for the Lok Sabha elections, | प्रचाराचा कडाका अन् उन्हाचा तडाखा; पाण्यासाठी खर्च होतोय पाण्यासारखा पैसा

प्रचाराचा कडाका अन् उन्हाचा तडाखा; पाण्यासाठी खर्च होतोय पाण्यासारखा पैसा

मनोज मुळ्ये

रत्नागिरी : एका बाजूला लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा जोर वाढत आहे आणि त्याचवेळी उन्हाचा तडाखाही चांगलाच बसत आहे. दिवसभरात होणाऱ्या प्रचारफेऱ्या, प्रचारसभा, कार्यकर्ते आणि नेत्यांचे दौरे यामुळे पाण्याच्या बाटल्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात असलेल्या पाण्याच्या बाटल्यांच्या खपापेक्षा यंदा १० ते १५ टक्के खप वाढला आहे. त्यातून केवळ रत्नागिरी शहरातच कमीत कमी २० ते २५ लाख रुपयांची उलाढाल वाढली आहे. ही वाढ केवळ निवडणुकांमुळेच वाढली असल्याचे वितरकांचे म्हणणे आहे.

लोकसभा, विधानसभांच्या निवडणुकांदरम्यान राजकीय नेत्यांचे दौरे, प्रचारासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे गावोगावी येणे-जाणे, उन्हातान्हात होणाऱ्या प्रचारसभा यामुळे अनेक प्रकारच्या व्यवसायांना गती मिळते. मंडप, वाहने, खाद्यपदार्थ यासह अनेक प्रकारच्या व्यवहारांमधून मोठी आर्थिक उलाढाल होते. प्रशासनाकडूनही जवळजवळ दीड ते दोन महिने वेगवेगळ्या प्रक्रिया सुरू असल्याने त्या काळातही अनेक लोकांना काम मिळते. कोट्यवधी रुपयांची उलाढाल त्यावेळी होते. एकूणच निवडणुकीतून अर्थकारणालाही चांगली गती मिळते.

पाण्याचा वापर सर्वाधिक

१. लोकसभेच्या निवडणुका दरवेळी एप्रिल-मे महिन्यांतच होतात. कडक उन्हाचे दिवस असल्याने पिण्याचे पाणी या काळात जास्त लागते. यंदा उन्हाळा अधिक तीव्र असल्याने पाण्याची गरजही वाढली आहे.
२. प्रत्येक प्रमुख राजकीय पक्ष आपले प्रचार कार्यालय सुरू करतो. प्रचाराचे नियोजन मतदार याद्या, मतदान केंद्रानजीकच्या बूथसाठीचे साहित्य, इतर प्रचार साहित्य यासारख्या गोष्टींचे वाटप या प्रचार कार्यालयांमधून होते. त्यामुळे तेथे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी यांची ये-जा अधिक असते.
३. प्रचार कार्यालयात सकाळी ८ पासून रात्री ११-१२ वाजेपर्यंत गर्दी असते. त्यामुळे तेथे पिण्याच्या पाण्याची गरज पडते. अशावेळी बाटलीबंद पाण्याचा वापर अधिक होतो. प्रचार कार्यालयांसाठी पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्सच घेतले जातात.
४. पदाधिकारी व कार्यकर्ते गावोगावचे प्रचारदौरे करतानाही पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स सोबत घेऊनच प्रवास करतात. यामुळेही पाण्याची मागणी वाढते.
५. मोठ्या नेत्यांच्या प्रचारसभांसाठीही पाण्याच्या बाटल्यांचा खप वाढतो. नेते येण्याच्या तासभर आधी लोक सभास्थळी येतात. त्यामुळे किमान दोन ते तीन तास ते एकाच जागी असतात. त्यामुळे पाण्याच्या बाटल्यांची गरज अधिक वाढते.

राजकीय क्रेझ अधिक

सभेमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, देणे ही आता क्रेझ झाली आहे. पूर्वी पाण्याचे मोठे जार भरून ठेवलेले असायचे आणि त्यातून पाणी दिले जायचे; पण आता सभेला आलेल्या लोकांना पाण्याच्या बाटल्या देणे हे अधिक सोयीचे ठरते. त्यामुळे प्रत्येक सभेसाठी बॉक्सच्या बॉक्स खरेदी केले जातात.

छोट्या बाटल्यांमुळे खर्च मोठा

अर्धा लिटर किंवा एक लिटरची बाटली लोकांना दिली तर बरेचदा पाणी फुकट घालवले जाते. त्यामुळे २५० मिलीची बाटली लोकांना देणे सोयीस्कर होते. घाऊकमध्ये २५० मिलीची पाण्याची बाटली साधारण साडेचार रुपयांना विकली जाते तर ५०० मिलीची बाटली ६ रुपयांना विकली जाते. दोन ते तीन तासांच्या सभेत एक व्यक्ती अर्धा लिटर पाणी तरी पितो. त्याला एकच अर्धा लिटरची बाटली देण्यापेक्षा २५० मिलीच्या दोन बाटल्या दिल्या गेल्या तर आपोआपच अधिक उलाढाल होते.

  • २५० मिली : रु. ४.५
  • ५०० मिली : रु. ६


२० ते २५ लाखांची उलाढाल

दरवर्षी एप्रिल महिन्यात बाटलीबंद पाण्याला जेवढी मागणी असते, त्यापेक्षा यंदा १० ते १५ टक्क्यांनी मागणी वाढली आहे. केवळ रत्नागिरी शहरातच १५ ते १६ छोटे-मोठे पाणी वितरक आहेत. त्या माध्यमातून केवळ शहरातच २० ते २५ लाखांची उलाढाल वाढली असल्याचा अंदाज आहे. याच पद्धतीने अन्य तालुक्यांचा विचार केल्यास तेथे यापेक्षा कमी मात्र तरीही लाखो रुपयांची उलाढाल केवळ निवडणुकीमुळे वाढली आहे.


उन्हाळा तीव्र आहे आणि प्रचाराचा जोर वाढत आहे. त्यामुळे यंदा पाण्याच्या बाटल्यांची मागणी १० ते १५ टक्क्यांनी वाढली आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात जी मागणी होती, त्यापेक्षा यंदा होत असलेली वाढीव मागणी ही निवडणुकीमुळे आहे. अजूनही पर्यटकांची गर्दी सुरू झाली नसल्याने ती मागणी अजून पुढे आलेली नाही. -अविनाश कुळकर्णी, मैत्री सेल्स, रत्नागिरी

Web Title: the use of water bottles is high due to the heat In campaigning for the Lok Sabha elections,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.