महिलांनी एकत्र येऊन सुरू केले रत्नागिरीत राज्यातील पहिलेच सुपर मार्केट, मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 06:23 PM2023-02-18T18:23:27+5:302023-02-18T18:24:01+5:30

राज्यात अन्यत्र ४०० ठिकाणी अशी सुपर मार्केट उभारण्यात येणार

The women came together and started the first super market in the state in Ratnagiri | महिलांनी एकत्र येऊन सुरू केले रत्नागिरीत राज्यातील पहिलेच सुपर मार्केट, मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक

महिलांनी एकत्र येऊन सुरू केले रत्नागिरीत राज्यातील पहिलेच सुपर मार्केट, मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक

googlenewsNext

रत्नागिरी : तब्बल १६०० महिलांनी एकत्र येऊन प्रत्येकी पाच हजारांची देणगी देत रत्नागिरीत ग्राहक बाजार सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केले. बचत गटातील महिलांनी एकत्र येऊन सुरू केलेले हे राज्यातील पहिलेच सुपर मार्केट आहे. ही संकल्पना मुख्यमंत्र्यांना आवडली असून, राज्यात अन्यत्र ४०० ठिकाणी अशी सुपर मार्केट उभारण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली असल्याची माहिती उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

शुक्रवारी पत्रकार परिषदेत मंत्री सामंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील निर्णयांची माहिती दिली. रत्नागिरीत सुरू झालेल्या बचत गटांच्या सुपर मार्केटला आता सरकारकडून आधार दिला जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीकडून महिला व बालकल्याण समितीसाठीच्या निधीतून दोन कोटी रुपये नगर परिषदेकडे वर्ग करत आहोत. नगर परिषद तीन कोटी रुपये देईल. या पाच कोटींमधून रत्नागिरीच्या आठवडा बाजारात एक संकुल उभे केले जाईल. जे सुपर मार्केट आता झाले आहे, त्याचे मॉलमध्ये रूपांतर करण्याचा हा प्रयत्न आहे. यात जिल्ह्यातील बचत गटांच्या उत्पादनांना विक्रीसाठी हक्काची जागा मिळेल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासाठी १०० नवीन बसेस मंजूर केल्या आहेत. त्यातील ५० रत्नागिरीला तर, ५० रायगडला मिळतील. यातील रत्नागिरीला मिळालेल्या बसेसचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी केला. रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेता काही ठिकाणी मोठ्या गाड्या जात नाहीत. त्यामुळे ५० मिनी बसेस देण्यालाही मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. त्याही महिन्याभरातच मिळतील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

गेल्या काही काळात रत्नागिरी जिल्हा म्हणून तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. रत्नागिरीतील अभियांत्रिकी महाविद्यालयाला लोकनेते शामराव पेजे यांचे नाव दिले जाणार आहे. त्यांच्या नावाने राजकारण करणारे अनेक लोक आहेत. पण याबाबतचा निर्णय त्यांनी आतापर्यंत घेतला नव्हता. तो आता झाला आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल, असे सामंत म्हणाले.

दापोली तालुक्यातील मुरूड येथे कुणबी समाजासाठी वसतिगृह उभारण्यासाठी सरकारने परतबोलीच्या अटीवर पाच कोटी रुपये दिले होते. वसतिगृहासाठी सात कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे काम रखडले होते. मात्र शिंदे सरकारने त्यासाठी सात कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तेही परतबोलीची अट रद्द करून देण्यात येणार आहेत, असे ते म्हणाले. पैसे परत देण्याच्या अटीवर देण्याच्या मागच्या सरकारच्या निर्णयामागचे कारण काय, हे मात्र आपल्याला समजले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या येथे माजी मंत्री बाळासाहेब सावंत यांचे स्मारक करण्याचा निर्णय २०१५ साली झाला. त्यासाठी ३५ लाख रुपयांची गरज होती. त्यांच्या हाताखाली तयार झालेले अनेक लोक मागच्या मंत्रिमंडळात होते. मात्र निधी मिळाला नाही. आता ते मंजूर झाले आहेत. महिन्याभरात त्याचा शुभारंभ होईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

राऊत यांना महत्त्व देत नाही

वारिशे यांच्या हत्येचा कट रत्नागिरीत एका बंगल्यावर शिजल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत केला. याबाबत प्रश्न करण्यात आला असता, मंत्री सामंत यांनी राऊत यांना मी महत्त्व देत नाही, असे सांगून विषय बदलला.

‘ते’ २५ लाख रुपये आले

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबाला सरकारने २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. मात्र त्यातील २५ पैसेही सरकार देणार नाही, अशी टीका काही ठराविक लोकांकडून सुरू झाली होती. हे २५ लाख रुपये शुक्रवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आले आहेत. ते कसे अदा करावेत, याबाबत काही तांत्रिक अडचणी असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आपल्याला सांगितले आहे. मात्र पत्रकारांशीच चर्चा करुन त्याबाबत निर्णय घेऊन ही मदत वारिशे कुटुंबाला लवकरच दिली जाईल, असे मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Web Title: The women came together and started the first super market in the state in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.