Ratnagiri: मिऱ्या बंधाऱ्याचे काम सुरू न झाल्याने ग्रामस्थ पतन विभागावर धडकले

By शोभना कांबळे | Published: June 12, 2024 04:12 PM2024-06-12T16:12:31+5:302024-06-12T16:15:11+5:30

रत्नागिरी : दरवर्षी पावसाळ्यात मिऱ्यावासीयांच्या डोक्यावर उधाणाची भीती असते. त्यामुळे बंधाऱ्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. ...

The work of Mirya dam is incomplete, Ratnagirikar demanded to complete the work | Ratnagiri: मिऱ्या बंधाऱ्याचे काम सुरू न झाल्याने ग्रामस्थ पतन विभागावर धडकले

Ratnagiri: मिऱ्या बंधाऱ्याचे काम सुरू न झाल्याने ग्रामस्थ पतन विभागावर धडकले

रत्नागिरी : दरवर्षी पावसाळ्यात मिऱ्यावासीयांच्या डोक्यावर उधाणाची भीती असते. त्यामुळे बंधाऱ्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. मात्र, निधी मिळूनही मिऱ्या बंधाऱ्याच्या धोकादायक टप्प्याचे काम पावसाळा लागल्यावरही सुरू न झाल्यामुळे मिऱ्या ग्रामस्थांनी पत्तन विभागावर धडक देत गावचे संरक्षण करण्यासाठी बंधाऱ्याचे काम करण्याची मागणी केली. यावेळी पत्तन अधिकाऱ्यांनी यावर लवकरच तोडगा काढू, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

मिऱ्या बंधाऱ्याचा पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा अडीचशे मीटरचा टप्पा अपूर्ण आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे साडेतीन किलाेमीटरचे काम करण्यात येणार आहे. मरीन ड्राइव्हच्या धर्तीवर हा पक्का बंधारा बांधण्यात येत आहे. साडेतीन किलाेमीटरपैकी अडीचशे मीटरचे काम शिल्लक आहे.

पत्तन विभागाने केलेल्या सर्वेक्षणामधील सात धोकादायक क्षेत्रांपैकी हे एक क्षेत्र आहे. समुद्राचा प्रवाह बदलला असल्यामुळे या भागात उधाणाच्या लाटांचा मोठा मारा बसतो. त्यामुळे किनाऱ्याची मोठ्या प्रमाणावर धूप होऊन हे पाणी मानवी वस्तीत येण्याचा धोका निर्माण झाला आहे. पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतच्या टप्प्याचे काम करताना लागणाऱ्या यंत्रसामग्रीची ने-आण करण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेवरून वाद होता. जागा मालकाने याला विरोध केल्यामुळे काम रखडले होते. परंतु, त्याने आता संमती दिली असली तरी समुद्राला उधाण असल्याने बंधाऱ्याचे तळातून खोदकाम करून काम करणे शक्य नाही. त्यामुळे पावसाळ्यानंतरच हे काम होण्याची शक्यता दिसत आहे.

त्यामुळे पावसाळ्यातील संकटाचा सामना कसा करायचा, या भीतीच्या छायेखाली असलेल्या मिऱ्यावासीयांनी मंगळवारी पत्तन विभागाचे अधिकारी साळुंखे यांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी साळुंखे यांनी संबंधित ठेकेदार आणि सल्लागार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढण्याचे आश्वासन या ग्रामस्थांना दिले. यावेळी मिऱ्या गावातील ग्रामस्थ सुनील कांबळे, नागेश कांबळे, राजू भाटकर, छोट्या भाटकर, बाबू कांबळे, मनोज पानगले, अनिल पानगले, विजय तळेकर, मुरलीधर पन्हळेकर, दत्तगुरू कीर आदी उपस्थित होते.

Web Title: The work of Mirya dam is incomplete, Ratnagirikar demanded to complete the work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.