चिपळुणात शासकीय धान्याची चोरी, एकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 04:52 PM2024-11-19T16:52:03+5:302024-11-19T16:55:40+5:30
चिपळूण : येथील रेशनच्या धान्याचा काळा बाजार हाेत असल्याच्या तक्रारी गेली अनेक महिने सुरू हाेत्या. अखेर शासकीय धान्याची चाेरी ...
चिपळूण : येथील रेशनच्या धान्याचा काळा बाजार हाेत असल्याच्या तक्रारी गेली अनेक महिने सुरू हाेत्या. अखेर शासकीय धान्याची चाेरी हाेत असल्याची बाब उघड झाली असून, तब्बल ७०० किलो धान्य चोरल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी संशयित म्हणून रमाकांत मोरे (रा. शिरळ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत ट्रक चालक कैलास शंकर सावंत (रा. देवरूख) यांनी पोलिस स्थानकात याबाबत फिर्याद दिली आहे. तीन दिवसांपूर्वी रत्नागिरीहून रेशनचे धान्य भरलेला ट्रक चिपळुणात दाखल झाला होता. मात्र, चालकाची तब्येत बिघडल्याने हा ट्रक चिपळूण पेठमाप येथे एका सोसायटीच्या गोडाऊनजवळ उभा होता. याचा फायदा घेत रमाकांत मोरे याने या ट्रकमधील ५० किलोची १४ पोती लांबविली. त्याची किंमत १७,५०० रुपये इतकी आहे.
याप्रकरणी चिपळूण पोलिस स्थानकात फिर्याद दाखल होताच रमाकांत मोरे याने धान्य चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातत्याने अशाच प्रकारे धान्याची चोरी होत असल्याचा संशय असून, याबाबत सातत्याने तक्रारी होत होत्या. त्यामुळे या प्रकरणात अन्य कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा तपासही पोलिस घेत आहेत.