पोलिसाच्या घरातच चोरी
By Admin | Published: March 31, 2017 10:55 PM2017-03-31T22:55:32+5:302017-03-31T22:55:32+5:30
पोलिसाच्या घरातच चोरी
रत्नागिरी : आजवर सर्वसामान्य नागरिकांची घरे फोडणाऱ्या चोरट्यांनी आता चक्क पोलिस वसाहतीतील पोलिसाच्या घरालाच लक्ष्य केले आहे. कुवारबांव पोलिस वसाहतीतील सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी २८ तोळे म्हणजेच सुमारे ८ लाख ४० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. चोरट्यांची टोळी
जेरबंद झाल्यानंतरही चोऱ्या होतच असल्याने आता पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वी दुकाने फोडणारी टोळी शहर पोलिसांनी जेरबंद केली. त्यानंतर तरी चोरीचे सत्र बंद होईल, अशी अशा व्यक्त करण्यात येत होती; परंतु आता पुन्हा एकदा चोरट्यांची टोळी शहरात सक्रिय झाली असून, या चोरट्यांनी चक्क सहायक पोलिस उपनिरीक्षकाच्या घरालाच लक्ष्य केले आहे. प्रणाली प्रवीण यादव (३८, कुवारबांव) या आपल्या कुटुंबासोबत कुवारबांव पोलिस वसाहतीमध्ये राहतात. प्रणाली यांचे सासरे सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पांडुरंग यादव यांची अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे गुरुवारी रात्री यादव कुटुंबीय त्यांना उपचारांसाठी कोल्हापूर येथे घेऊन गेले. त्यांच्या घरात कोणीही नव्हते. त्याच रात्री अज्ञात चोरट्यांनी वसाहतीत प्रवेश केला आणि यादव यांचा बंद फ्लॅट फोडला.
आजूबाजूच्या लोकांना कोणत्याही प्रकारचा सुगावा लागू नये, यासाठी या चोरट्यांनी शेजारच्या सर्व फ्लॅटच्या दरवाजांना कडी लावून घेतली. प्रणाली यादव यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरटे आतमध्ये गेले. बेडरूममधील कपाट फोडून सुमारे ८ लाख ४० हजार रुपये किमतीचे २८ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. याच कॉलनीतील दुसरा फ्लॅटही या चोरट्यांनी फोडला; परंतु या फ्लॅटमध्ये चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी शेजाऱ्यांना यादव यांचा फ्लॅट फोडला गेला असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी याची खबर तत्काळ प्रणाली यादव यांना दिली. त्यांनी रत्नागिरीत येऊन शहर पोलिस स्थानक गाठले. त्यानुसार गुन्हा दाखल होण्याचे काम शुक्रवारी रात्री उशिरापर्यत सुरू होते. चोरीची माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. (वार्ताहर)