शेतघरातील साहित्यासह पाण्याच्या पंपाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:21 AM2021-07-04T04:21:48+5:302021-07-04T04:21:48+5:30
लांजा : शहरापासून जवळच असलेल्या धुंदरे येथील शेतीफार्म हाऊसमध्ये ठेवलेले साहित्य तसेच विहिरीवरील पंप चोरट्याने चोरल्याची घटना गुरुवारी रात्री ...
लांजा : शहरापासून जवळच असलेल्या धुंदरे येथील शेतीफार्म हाऊसमध्ये ठेवलेले साहित्य तसेच विहिरीवरील पंप चोरट्याने चोरल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ नंदकुमार तांबट (४०, रा. लांजा बाजारपेठ) यांच्या मालकीची धुंदरे येथे जमीन आहे. साईनाथ तांबट व त्यांचा कामगार दिलीप गुरव यांनी गुरुवारी शेतातील कामे आटोपून सायंकाळी ६.३० वाजता शेतघर बंद करुन घरी गेले होते. शुक्रवारी सकाळी ९ वाजता शेतावर काम करण्यासाठी आले असता, शेतघरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी शेतघराचे सिमेंट पत्रे तपासून पाहिले असता, त्यांना एक पत्रा उचकटलेला दिसला. तसेच शेतघरातील ५ हजार रुपये किमतीचा एक क्राॅम्पटन कंपनीचा १ एच. पी. जुना वापरातील पंप, १ हजार रुपये किमतीचा काऊंटर कंपनीचा जुना वजन काटा, १ हजार रुपये किमतीचा पाॅकेट स्केल डिजिटल वजन काटा, १ हजार रुपये किमतीची वजन मापे आदी चाेरल्याचे दिसले. यावेळी त्यांना पंप हाऊसच्या दरवाजाची लोखंडी कडी उचकटलेली दिसली. दरवाजा उघडून आतमध्ये गेले असता, विहिरीत १० हजार रुपये किमतीचा क्राॅम्पटन कंपनीचा पाण्याचा पंपही चाेरल्याचे दिसले. शेतघर व विहिरीतील पंप असे १८ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेल्याने साईनाथ तांबट यांनी लांजा पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. याबाबतचा अधिक तपास पोलीस काॅन्स्टेबल दिनेश आखाडे करत आहेत.