अपंग, बेरोजगारांसाठी कार्य करण्याचा त्यांचा ध्यास
By admin | Published: August 29, 2014 10:11 PM2014-08-29T22:11:48+5:302014-08-29T23:14:19+5:30
संवाद सेवाभावी संस्था : लांजा तालुक्यात अपंग आणि बेरोजगार तरूणांना दिलासा
कुवे : सध्या बेरोजगारांना नोकरी मिळणे अवघड झाले आहे. त्यातून ग्रामीण भागातील बेरोजगारांची समस्या तर अधिकच जटील आहे. मात्र, अशांना रोजगाराची संधी मिळवून देण्याची संधी लांजात एकत्र आलेल्या सुशिक्षित तरूणांनी मिळवून दिली. याचबरोबर अपंगांनाही शासकीय सुविधा मिळवून देण्यासाठी हे तरूण ‘संवाद सेवाभावी संस्थे’च्या माध्यमातून झटत आहेत.
सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार व अपंगांना त्याच्या मिळणाऱ्या शासकीय सुविधा, सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाच्या असलेल्या वेगवेगळ्या योजना, त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रम राबवणे, सामाजिक उपक्रम राबविणे, अशी अनेक उद्दीष्टे डोळ्यासमोर ठेवून तालुक्यातील प्रत्येक स्तरावरील समविचारी जनतेला तसेच सुशिक्षित तरुणांना एकत्र करुन लांजात ‘संवाद सेवाभावी संस्थे’चे कार्य अनेक वर्षे सुरु आहे.
संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार कांबळे या छोट्याशा संस्थेचे मोठ्या वटवृक्षामध्ये रुपांतर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या संस्थेने गावागावात जाऊन २३० ते २५० अपंगांना आतापर्यंत शासकीय प्रमाणपत्र मिळवून दिली आहेत. तसेच २०० तरुणांना एकत्र करुन लहान-मोठे रोजगार मिळवून दिले आहेत. तसेच तरुणांना स्वयंरोजगार करण्यास मदत व्हावी म्हणून शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला आहे. जातीचे दाखले, शासकीय दाखले, कागदपत्रांसाठी सर्वसामान्याची होणारी धावपळ कमी व्हावी, यासाठी त्यांना माहिती मिळावी, यासाठी संस्थेने काही माणसे नेमली आहेत. त्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून गरीब जनतेला आता आधार मिळाला आहे. रोजगार मार्गदर्शन, शिबिर, व्यसनमुक्ती, जनजागृती, रक्तदान शिबिर, नेत्रदान यांसारखे अनेक उपक्रम संस्था लांजा येथे राबवत आहे. नंदकुमार कांबळे यांनी या संस्थेच्या माध्यमातून अपघातग्रस्तांना मदत म्हणून सिद्धिविनायक ट्रस्ट, पाटील ट्रस्ट यांसारख्या नामवंत सेवाभावी संस्थांकडून मदत मिळवून दिली आहे. शासनाच्या प्रत्येक योजना शाळांपासून प्रत्येक घरातील कामगारांपर्यंत पोचवण्याचे काम संवाद सेवाभावी संस्था करीत आहे.
या संस्थेच्या माध्यमातून अपंगांना जास्तीत जास्त मदत व्हावी व बेरोजगारांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध व्हावेत, यासाठी आता मोठमोठे उपक्रम राबवित आहे. या माध्यमातून याचा लाभ लांजा तालुक्यातील जास्तीत जास्त अपंग तरुणांनी तसेच इतर सुशिक्षित बेरोजगारांनी घ्यावा, यासाठी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार कांबळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन या संस्थेने केले आहे. (वार्ताहर)