जीवनाच्या अखेरच्या प्रवासातही ‘त्यां’ची एकमेकांना साथ!

By admin | Published: June 10, 2016 12:06 AM2016-06-10T00:06:52+5:302016-06-10T00:15:08+5:30

रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावरील वारूल येथे कारचा टायर फुटून अपघात झाला. या अपघातात या दाम्पत्याचा मृत्यू झाला.

On their last journey of life, they are together! | जीवनाच्या अखेरच्या प्रवासातही ‘त्यां’ची एकमेकांना साथ!

जीवनाच्या अखेरच्या प्रवासातही ‘त्यां’ची एकमेकांना साथ!

Next

रत्नागिरी : विवाहानंतर ३३ वर्षे एकमेकांना खऱ्या अर्थाने साथ दिलेले महावितरणचे निवृत्त अधीक्षक अभियंता दत्ता कुरतडकर आणि त्यांची पत्नी निवृत्त शिक्षिका वृषाली कुरतडकर यांचा रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावरील वारूल येथे कारचा टायर फुटून अपघात झाला. या अपघातात या दाम्पत्याचा मृत्यू झाला. आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे वचन पाळतानाच त्यांनी अखेरचा निरोपही एकत्रच घेतला. आज (गुरुवारी) सकाळी या दोघांवर शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीत भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  ३२ वर्षांच्या सेवाकाळातही दत्ता कुरतडकर यांनी जिल्ह्याकरिता अनेक योजना आणल्या. रत्नागिरी येथे सेवेत असताना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यांनी रत्नागिरीत पथदीप योजना राबवली. याची दखल घेत राज्य सरकारने २००७ -२००८ साली ही योजना संपूर्र्ण राज्यात अमलात आणली. ते जून २०११मध्ये लातूर येथे अधीक्षक अभियंता पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी शैक्षणिक, सामाजिक कार्याला अधिकच वेळ दिला. मिरजोळीचे माजी आमदार रमेश कदम त्यांचे स्नेही. चिपळूणमधील राजकीय व्यक्तींमधील एकोप्याची ते नेहमी प्रशंसा करीत. कदम यांच्याकडून त्यांना एकीचे बाळकडू मिळाले. त्यामुळे रत्नागिरीतही त्यांनी विविध धार्मिक संघटना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. २००८ आणि २०१६ साली रत्नागिरीत सर्व बौद्ध संघटनांना एकत्र आणून सर्वपक्षीय नेत्यांना व्यासपीठावर आणण्याचे श्रेय कुरतडकर यांनाच जाते.
अ. के. देसाई हायस्कूलमध्ये शिक्षिका असलेली त्यांची पत्नी वृषाली याही २०१३ साली सेवानिवृत्त झाल्या. आदर्श शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांमध्ये त्यांनीही प्रतिमा जतन केली होती. त्यामुळे या दोघांचे सामाजिक कार्य अधिकच वेगाने होत गेले. कुठल्याही कार्यक्रमात ‘श्री तिथे सौ’ असे बघण्याची सवय साऱ्यांनाच होती. आनंदी, हसमुख दाम्पत्य, अशीच या दोघांची ओळख होती. मुलगा कुणालच्या लग्नाच्या वेळी दत्ता कुरतडकर यांचा सर्व क्षेत्रातील दांडगा संपर्क दिसून आला.
मुलाच्या लग्नानंतर पूर्णपणे सामाजिक कार्यासाठी एकत्रित वाहून घेतलेल्या या दाम्पत्याचा बुधवारी कारच्या अपघातात होऊन दुर्दैवी मृत्यू झाला आणि ३२ वर्षे सहजीवनाचे खऱ्या अर्थाने समाधान मिळालेल्या या दाम्पत्याने अखेरचा श्वासही एकत्रच घेतला. मात्र, मुलगा कुणाल आणि सन्याल याचबरोबर पाच भाऊ आणि सहा बहिणी, वृद्ध आई, मेहुणे, भाचे, भाच्या अशा मोठ्या परिवाराचा डी. के. कुरतडकर यांच्या रूपातील मार्गदर्शक, आधारस्तंभ हरपला आहे.
आज त्यांच्या निवासस्थानाहून निघालेल्या त्यांच्या अंत्ययात्रेत शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी सहभागी झाली होती. सर्वपक्षीय मंडळींशी, सर्वधर्मियांशी त्यांचे स्नेहाचे संबंध असल्याने सर्वधर्मीय व्यक्ती अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: On their last journey of life, they are together!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.