...तर सरकारला खाली खेचू, उद्धव ठाकरे यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 02:21 AM2017-11-16T02:21:41+5:302017-11-16T02:21:59+5:30
रत्नागिरीतील माळनाका येथे उभारलेल्या स्कायवॉकचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्यानंतर झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
रत्नागिरी : शिवसेना सत्तेत सहभागी आहे. परंतु, जनतेच्या मुळावर येणारे निर्णय सरकार घेणार असेल तर मी सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे दिला.
रत्नागिरीतील माळनाका येथे उभारलेल्या स्कायवॉकचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्यानंतर झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, सरकारला कर्जमाफी करण्यासाठी शिवसेनेने भाग पाडले. मात्र, त्यानंतरही कर्जमाफी शेतक-यांपर्यंत पोहोचलेली नाही, हे दुर्दैवी आहे. शिवशाही कर्जमाफी योजना, असे नाव देऊन शिवरायांची अशी बदनामी कोण करणार असेल तर ते खपवून घेणार नाही.
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. जिल्ह्यातील संपूर्ण सत्ता सेनेकडे आहे. त्यामुळे आता हे सेनेचे वैभव टिकविण्याची जबाबदारी शिवसैनिकांवर आहे. कोकणातील शिवसेनेची ही भगवी लाट संपूर्ण राज्यभरात पसरत असून, याची अनेकांनी धास्ती घेतली आहे, असेही ते म्हणाले.