..तर रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाइ
By admin | Published: March 3, 2015 09:12 PM2015-03-03T21:12:31+5:302015-03-03T22:18:03+5:30
चिपळूणची वाहतूक कोंडी : नगर परिषद, पोलिसांकडून संयुक्त बैठर्क
चिपळूण : सध्या शहरात होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्याच्यादृष्टीने पोलीस यंत्रणा व नगर परिषद यांच्या सहकार्याने शहरातील हातगाड्या हटवण्यात आल्या आहेत. याच अनुषंगाने नुकत्याच झालेल्या रिक्षा व्यावसायिकांच्या बैठकीत वाहतूक सुरळीत होण्यासाठी सहकार्य करावे. नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी सूचना देण्यात आली आहे.
शिवाजी चौक ते मुख्य बसस्थानक रस्त्यावर उभ्या असणाऱ्या हातगाड्यांमुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत होती. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार शहर परिसरात हातगाडी हटाव मोहीम राबवण्यात आली. बाजारपेठेतील वाहतुकीला अडथळा होणाऱ्या हातगाड्याही हटवण्यात आल्या. त्यामुळे सध्या मुख्य रस्त्याने मोकळा श्वास टाकला आहे.
शिमगोत्सवादरम्यान बाजारपेठेत होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन वाहतूक पोलीस यांच्या मदतीने शहरातील पोलीस चौकी येथे रिक्षा व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत रिक्षा व्यावसायिकांना पोलीस यंत्रणेतर्फे काही सूचना करण्यात आल्या आहे. मुख्य रस्त्यावर जास्त वेळ रिक्षा उभी करु नये, रिक्षा थांब्या व्यतिरिक्त कोणीही अन्य ठिकाणी रिक्षा उभी राहणार नाही याची दक्षता घ्यावी. एखाद्या ठिकाणी अधिकवेळ एक रिक्षा उभी असेल तर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. रिक्षा व्यावसायिकांनी पोलीस यंत्रणेला आवश्यक ते सहकार्य केल्यास बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी दूर होण्याच्यादृष्टीने मदत होणार आहे. रिक्षा व्यावसायिकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनेचे पालन करावे, असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले आहे. रिक्षा व्यावसायिकांनी काही समस्याही वाहतूक पोलिसांसमोर मांडल्या. या सूचनेनंतर आता वाहतूक कोंडी दूर करण्याबाबत कोणती कारवाई केली जाणार, याकडे लक्ष दिले जात आहे. (वार्ताहर)