..तर तरुणांना नोकरीसाठी जिल्हा सोडावा लागणार नाही, उद्योगमंत्र्यांनी व्यक्त केलं मत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 02:17 PM2023-02-13T14:17:06+5:302023-02-13T14:19:15+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात नोकरी मेळावा हाेणार
रत्नागिरी : येत्या वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यात चांगले प्रकल्प येणार असून, जिल्ह्यात येणाऱ्या प्रकल्पांचे तरुणांनी स्वागत करावे. जेणेकरून नोकरीसाठी जिल्हा सोडून बाहेर जावे लागणार नाही. ज्या संख्येने नोकरी मेळाव्यासाठी उपस्थित आहात, तेवढ्याच उमेदीने चांगल्या प्रकल्पाचे स्वागत करा. त्यामुळे पुढील नोकरी मेळाव्यात रत्नागिरीतच नोकऱ्या उपलब्ध होण्याची संधी प्राप्त होईल, असे प्रतिपादन राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेच्या मैदानावर जिल्हा प्रशासनातर्फे महाराेजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मंत्री सामंत बाेलत हाेते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, ज्येष्ठ उद्योजक अण्णा सामंत, उद्योग विभागाचे सहसंचालक सतीश भामरे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, रायगड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. एस. हरळय्या, पालघर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उद्धव माने, युवा हबचे संचालक किरण रहाणे यांच्यासह शशिकांत जगताप, बिपीन बंदरकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी नगरसेविका स्मितल पावसकर, शिल्पा सुर्वे उपस्थित होते.
मंत्री सामंत पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात नोकरी मेळावा हाेणार आहे. उद्योगमंत्री असल्यामुळे मेळाव्याची सुरुवात आपल्या जिल्ह्यातून करण्यात आली. या मेळाव्यासाठी ७,८०० युवकांनी नोंदणी केली आहे. उशीर झाला तरी शेवटच्या उमेदवाराची मुलाखत होईपर्यंत हा मेळावा सुरू असेल. कोकणातील जनता, मुले संयमी आहेत. येथील मुलांनी एखादी गोष्ट मनावर घेतली तर ते सिद्ध करून दाखवतात, हे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कोकण विभागाचे उद्योग सहसंचालक सतीश भामरे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनीही मनोगत व्यक्त केले. अभिजित गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी आभार मानले.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत कर्ज मंजुरी पत्रे वितरित करण्यात आली. तसेच ज्या युवक-युवतींची नोकरीसाठी निवड झाली त्यांना मंत्री सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्रेही देण्यात आली. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी ज्या बँकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, त्या बॅंक व्यवस्थापकांचा सत्कार करण्यात आला.