दहावीच्या गुणपत्रिका वितरणाबाबत अद्याप सूचना नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:24 AM2021-07-17T04:24:58+5:302021-07-17T04:24:58+5:30
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल ...
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. दरवर्षी ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप दहा दिवसांनी केले जाते. मात्र, कोरोनामुळे अधिकृत तारीख महामंडळाकडूनच जाहीर झालेली नाही. निकाल पाहण्यासाठी साइट चार तासापेक्षा अधिक वेळ सुरू न झाल्याने प्रत्यक्ष निकाल पाहण्याचा आनंद घेता आला नाही. त्यातच गुणपत्रिका वितरणाबाबत काहीच सूचना नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
शाळांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका वाटपासाठी अधिकृत तारीख विभागीय मंडळातर्फे जाहीर झाल्यानंतर त्या तारखेला शाळांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप करण्यात येणार आहे, तर त्याच दिवशी शाळांतर्फे विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वितरण करण्यात येणार आहे.
शासन निर्णयाप्रमाणे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा सन २०२१चा निकाल माध्यमिक शाळास्तरावर विविध मूल्यांकन प्रक्रियेद्वारे तयार करण्यात आलेला असल्याने तसेच अंतर्गत मूल्यमापनासाठी ग्राह्य धरलेल्या प्रथम सत्र/सराव परीक्षा/अन्य मूल्यमापन इत्यादी परीक्षांच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना दाखविल्या/घरी दिल्या जात असल्याने गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रति मिळणे, पुनर्मूल्यांकन या सुविधा संबंधित परीक्षांसाठी कोणत्याही स्तरावर उपलब्ध राहणार नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
श्रेणी/गुण सुधार योजना
दि. २८ मे २०२१च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सन २०२१ दहावी परीक्षेस श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील एक/दोन संधी उपलब्ध राहणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.