दिवाळीत गुहागर तालुक्यात होणार राजकीय धमाका, भास्कर जाधवांना धक्का बसणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 06:30 PM2022-10-20T18:30:14+5:302022-10-20T18:30:37+5:30

गुहागर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता

There is a possibility of a big split among Shiv Sainiks in Guhagar taluka | दिवाळीत गुहागर तालुक्यात होणार राजकीय धमाका, भास्कर जाधवांना धक्का बसणार?

दिवाळीत गुहागर तालुक्यात होणार राजकीय धमाका, भास्कर जाधवांना धक्का बसणार?

Next

असगोली : गेल्या दोन-अडीच महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली. त्याचे परिणाम राज्यातील अनेक भागांत पाहायला मिळत आहेत. आता हीच राजकीय उलथापालथ आमदार भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदार संघातही होणार आहे. दिवाळीत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा असून, याबाबत मतदार संघातील उद्धव ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे.

राज्यात ठाकरे - शिंदे गट असा वाद टोकाला गेला आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन आमदार आणि एक माजी आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत, तर आमदार भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत. शिंदे आणि ठाकरे यांच्या या वादात ठाकरे शिवसेनेची घडी बसविण्यासाठी आमदार भास्कर जाधव सगळीकडे मेळावे घेऊन शिंदे गटावर हल्लाबोल करत आहेत. शिवसैनिकांना ठाकरेंच्या शिवसेनेशी जोडून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांच्याच मतदार संघातील शिवसेनेचे नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटाशी जवळीक साधत आहेत.

शिवसेनेचे गुहागर तालुक्यातील सरपंच, युवा कार्यकर्ते व ज्येष्ठ शिवसैनिक शिंदे गटात सामील हाेण्याच्या तयारीत आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत व त्यांचे बंधू किरण सामंत यांच्या माध्यमातून गुहागर मतदार संघातील कार्यकर्ते शिंदे गटात दाखल हाेणार आहेत. दिवाळीतच हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हाेणार आहे. गुहागरात शिंदे गटांच्या बैठकाही हाेत असून, त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या बैठकांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले जात आहे.

गुहागर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे, तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनीही मंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्याने गुहागरात दिवाळी राजकीय धमाका उडण्याची शक्यता आहे.

Web Title: There is a possibility of a big split among Shiv Sainiks in Guhagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.