Ratnagiri: परशुराम घाट चौपदरीकरणात भूकंपप्रवण क्षेत्राचा विचारच नाही, दरडी कोसळल्यानंतर आता अभ्यास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 17:43 IST2024-12-17T17:42:50+5:302024-12-17T17:43:11+5:30

चिपळूण : तालुका, शहर परिसर हा भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून शासन दरबारी नोंद आहे. या ठिकाणी होणारी सर्वप्रकारची बांधकामे किमान ...

There is no consideration of earthquake prone area in Parashuram Ghat four tiering | Ratnagiri: परशुराम घाट चौपदरीकरणात भूकंपप्रवण क्षेत्राचा विचारच नाही, दरडी कोसळल्यानंतर आता अभ्यास सुरू

Ratnagiri: परशुराम घाट चौपदरीकरणात भूकंपप्रवण क्षेत्राचा विचारच नाही, दरडी कोसळल्यानंतर आता अभ्यास सुरू

चिपळूण : तालुका, शहर परिसर हा भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून शासन दरबारी नोंद आहे. या ठिकाणी होणारी सर्वप्रकारची बांधकामे किमान ७ रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचा धक्का सहन करू शकतील, अशा दर्जाची करणे बंधनकारक आहे. हा नियम शासकीय कामांनाही लागू आहे. त्यानुसार उंचीच्या मानाने जमिनीखाली किती प्रमाण फूट खोलीपासून बांधकाम करावे, याचा विचार संबंधित तंत्रज्ञ व अभियंत्यांनी करणे गरजेचे आहे. मात्र, त्याचा शोध आणि बोध उड्डाणपूल कोसळल्यानंतर, तसेच परशुराम घाटात वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांनंतर सुरू झाला आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला प्रत्यक्षात सुरुवात होऊन १५ वर्षांचा कालावधी लोटला आहे. परशुराम घाटात गेल्या दोन ते तीन वर्षांत भराव टाकून व एका बाजूला डोंगर कटाई करून रुंद केलेल्या मार्गावर पावसाळी हंगामापासूनच आजपर्यंत अनेक छोट्या-मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी संरक्षक भिंत असलेल्या डोंगराच्या बाजूकडील दरड कोसळली आहे.

शहरात बहादूरशेख ते प्रांत कार्यालयादरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामातील चुकीच्या घोळामुळे दोन ते तीनवेळा दुर्घटना घडल्या आहेत. या दोन्ही ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांनंतर संबंधित ठेकेदार कंपनी, तसेच महामार्ग विभाग व तंत्रज्ञ, अभियंते घटनास्थळी भेट देऊन या मागील कारणांचा शोध घेण्याचे नियोजन करताना दिसून येत आहेत. मात्र, प्रत्यक्षात काम सुरू करण्यापूर्वी तांत्रिकदृष्ट्या अभियंत्यांकडून संबंधित जागेची सर्वंकष पाहणी, जमिनीची ताकद, दगड, हवा, पाणी अशा सर्व नैसर्गिक बाबींचा अभ्यास व समतोल साधून त्या दृष्टीने सुरक्षित आराखडा व नियोजन होणे गरजेचे असताना अशाप्रकारे कोणतेही नियोजन केले नसावे, हे या दुर्घटनांवरून आता उघड होऊ लागले आहे.

वेळीच विचार होणे आवश्यक होते

  • चिपळूणच्या उड्डाणपुलाचा काही भाग दोनवेळा कोसळल्यानंतर ठेकेदार कंपनी व महामार्ग विभागातील संबंधित अधिकारी, तंत्रज्ञांनी आता नवे डिझाइनचे आरेखन करून नव्याने पुलाचे काम हाती घेतले आहे. तसेच, परशुराम घाटातील खचलेला रस्ता व भराव आणि कोसळलेली भिंत याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी पुन्हा एकदा तंत्रज्ञांची टीम संशोधनासाठी दाखल झाली आहे.
  • मुळातच घाटातील रस्ता रुंद करण्यासाठी सुमारे सत्तर ते ऐंशी टक्के भागात मूळ जुन्या रस्त्यावर लाखो ब्रासचा भराव करून हा भाग दहा ते पंधरा फूट उंच करण्यात आला. दुसऱ्या बाजूला डोंगर कटाई करून कमकुवत संरक्षक भिंती बांधण्यात आल्याने या मार्गावरील धोका वाढला आहे.
  • संरक्षक भिंत उभारण्याकरिता मूळ रस्त्याच्या पृष्ठभागाखाली कठीण कातळाचा शोध घेऊन संरक्षक भिंत उभारण्याचे नियोजन व भूकंप प्रणव क्षेत्राचा विचार झाला असता, तर अशा दुर्घटना टळल्या असत्या, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे.

Web Title: There is no consideration of earthquake prone area in Parashuram Ghat four tiering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.