राज्यावर भारनियमनाचे संकट नाही

By admin | Published: June 4, 2016 12:24 AM2016-06-04T00:24:10+5:302016-06-04T00:26:49+5:30

महावितरणची माहिती : कोयनेतील पाणीसाठा १३ टीएमसी

There is no burden of burden on the state | राज्यावर भारनियमनाचे संकट नाही

राज्यावर भारनियमनाचे संकट नाही

Next

रत्नागिरी : कोयना धरणातील पाणीसाठा केवळ १३ टीएमसी इतका आहे. त्यामुळे वीजनिर्मितीवर परिणाम होणार असला तरी राज्यावर भारनियमनाचे संकट नसल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली आहे. सध्या मागणीप्रमाणे वीजपुरवठा सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.
कोयना धरणाच्या पाण्याची क्षमता १०५ टीएमसी इतकी आहे. जलविद्युत प्रकल्पातून १९२० मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होते; परंतु गतवर्षी सरासरीपेक्षा निम्मा पाऊस झाल्याने सद्य:स्थितीत पाणी केवळ १३ टीमसी इतकेच शिल्लक राहिले आहे. पैकी चार टीएमसी हा मृत पाणीसाठा आहे, तर उर्वरित नऊ टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचनासाठी राखीव ठेवण्यात आल्याने वीजनिर्मिती होऊ शकणार नाही. सद्य:स्थितीत केवळ ४० मेगावॅट इतकीच वीजनिर्मिती कोयना एक व दोन प्रकल्पांतून होत आहे.
नाशिक येथे ४६१, कोराडी ७४७, खापरखेडा ९३५, पारस ३६५, चंद्रपूर १३२९, भुसावळ ९५८, उरण येथील गॅस प्रकल्पातून २३२, कोयना प्रकल्प एक व दोनमधून ४०, साखरी येथील सौरऊर्जा प्रकल्पातून ९०, खासगी प्रकल्पातून ४२४९, केंद्रीय प्रकल्पातून ६९६४ मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे. परळी येथील प्रकल्प गेले दहा महिने बंद असल्याने वीजनिर्मिती होत नाही, तर गुहागर येथील रत्नागिरी गॅस प्रकल्पातून ३५० मेगावॅट वीजनिर्मिती होते. मात्र, ती कोकण रेल्वेसाठी देण्यात येते.
वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने एसी, पंखे, कूलरचा वापर वाढला आहे. त्यासाठी विजेची मागणी वाढत असली तरी नियोजनबद्ध पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे भारनियमन करावे लागणार नाही. पावसाने गुरुवारी हजेरी लावली आहे. त्यामुळे दररोज पाऊस सुरू झाला तर पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते किंबहुना हवेत गारवा निर्माण झाला तर मागणीवरही परिणाम होईल. गेली दोन वर्षे भारनियमन करण्यात आलेले नाही. आकस्मिक भारनियमन गतवर्षी करण्यात आले होते. मात्र, यावर्षी तेही करण्यात आलेले नाही. भविष्यातही करावे लागणार नसल्याचे महावितरणने सांगितले आहे. (प्रतिनिधी)

आकस्मिक परिस्थितीवेळी
तातडीचे नियोजन
वाढत्या उष्म्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. सध्या १८ हजार ४७६ मेगावॅट इतकी विजेची गरज असून, संपूर्ण राज्यात १६ हजार ३७० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी २ हजार १०६ मेगावॅटचा फरक असला तरी अद्याप राज्यावर भारनियमनाचे संकट नाही. भविष्यात आणखी मागणी वाढली तरी संकट ओढवणार नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महावितरणने आकस्मिक परिस्थितीसाठी तातडीच्या वीजपुरवठ्याचे नियोजन केले आहे.

Web Title: There is no burden of burden on the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.