नुकसान भरपाईसाठी तरतूद नाही, मात्र सफाईसाठी प्रयत्न करणार : साळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:21 AM2021-07-21T04:21:47+5:302021-07-21T04:21:47+5:30

रत्नागिरी : शहरातील नाले सफाईकडे नगर परिषदेकडून दुर्लक्ष झाले. खोदकामामुळे माती नाल्यात जाऊन नाले तुंबल्याने शहरातील विविध भागात ...

There is no provision for compensation, but will try to clean up: Salvi | नुकसान भरपाईसाठी तरतूद नाही, मात्र सफाईसाठी प्रयत्न करणार : साळवी

नुकसान भरपाईसाठी तरतूद नाही, मात्र सफाईसाठी प्रयत्न करणार : साळवी

Next

रत्नागिरी : शहरातील नाले सफाईकडे नगर परिषदेकडून दुर्लक्ष झाले. खोदकामामुळे माती नाल्यात जाऊन नाले तुंबल्याने शहरातील विविध भागात पावसाचे पाणी साचले होते. नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले असून, नगर परिषदेकडून नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली. त्यावरून सभागृहात गोंधळ निर्माण झाला. भरपाई देण्यासाठी नगर परिषदेकडे कोणतीही तरतूद नाही. परंतु सफाईसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी दिले.

नगर परिषदेची मासिक सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीलाच शहरात पावसाचे पाणी तुंबल्याने नागरिकांच्या घरात शिरल्याचा विषय भाजपच्या सदस्यांनी उचलून धरला. संततधार पावसामुळे नगर परिषदेची नाले सफाई उघड्यावर पडली. पावसाळ्यातील नाले सफाईसाठी नगर परिषदेकडून कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र निविदा काढूनही शहरात सफाई झाली नाही. त्यामुळे गटारे तुंबून शहरात पाणी भरले. पाण्याचा लोंढा नागरिकांच्या घरात शिरल्याने नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला. नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नुकसान झाले असल्याने ज्या नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी गटनेते समीर तिवरेकर, राजू तोडणकर, मुन्ना चवंडे, उमेश कुळकर्णी, सुप्रिया रसाळ, मानसी करमरकर आदींनी केली. नगरसेविका सुप्रिया रसाळ यांनी याबाबतचे निवेदन नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांना दिले.

नालेसफाई पूर्ण झाली आहे. नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची कोणतीही तरतूद नाही. तरी याबाबत विचार करून निवेदनाबरोबर नुकसान झाल्याचे काही फोटोही जोडा, असे नगराध्यक्ष साळवी यांनी सांगितले. नाले सफाईला एकदाच सफाई कर्मचारी आले. त्यानंतर आलेच नाहीत. नाले सफाईच झाली नसल्याने शहरात पाणी भरल्याचा आरोप विरोधकांनी केला. मुख्य पऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. परे तोंडावर तुंबल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याचे सांगितले. नगराध्यक्ष साळवी यांनी आरोग्य सभापतींना घेऊन ज्या ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घडना घडल्या आहेत. त्या ठिकाणी संबंधित नगरसेवकांनी जाऊन पाहणी करून तत्काळ उपाययोजना करण्याची सूचना केली.

सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही उपाय केले जात नाहीत. त्यांना जॅकटे, बुट, हॅण्डग्लोज दिले जात नाहीत का, असा प्रश्न भाजपच्या सदस्यांनी केला. याला उत्तर देताना आरोग्य सभापती नीमेश नायर म्हणाले, सर्व साहित्य पुरवतो. मात्र, सफाई कर्मचारी ते वापरत नाहीत. यावर नगराध्यक्ष साळवी म्हणाले. योग्य ते साहित्य पुरविले असेल तर ते कर्मचाऱ्यांनी वापरणे बंधनकारक आहे. मात्र, जे कर्मचारी वापरत नाहीत, त्यांना निलंबित करण्याची सूचना केली.

Web Title: There is no provision for compensation, but will try to clean up: Salvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.