मग्रारोहयोच्या कार्यालयीन खर्चासाठी दमडीही नाही
By admin | Published: December 29, 2014 08:43 PM2014-12-29T20:43:53+5:302014-12-29T23:35:33+5:30
जिल्हा परिषद कक्षातील दूरध्वनी यंत्रणा बंद
रत्नागिरी : विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे़ मात्र, जिल्हा परिषदेतील कक्षाच्या कार्यालयीन खर्चासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेकडून वर्षभरात दमडीही दिलेली नाही़ त्यामुळे या योजनेचे काम करणाऱ्या जिल्ह्याच्या मुख्य कक्षाची अवस्था दिव्याखाली अंधार अशी झाली आहे.
मग्रारोहयोच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याने ही कामे सुरु झालेली नसल्याची ओरड प्रशासनाकडून सुरु आहे़ कोट्यवधी रुपयांचा निधी विनाखर्च पडून आहे़ मग्रारोहयोची जिल्हास्तर, तालुकास्तर आणि ग्रामस्तरावर कामे चालतात़ त्यासाठी जिल्हा परिषद कक्ष, पंचायत समिती कक्ष आणि ग्रामपंचायत कक्ष स्थापन करण्यात आली आहेत़
या योजनेच्या एकूण खर्चापैकी ०़१० टक्के खर्च कार्यालयीन कामासाठी करण्यात येतो़ त्यासाठी जिल्हा परिषद कक्ष ०़१० टक्के, पंचायत समिती कक्ष ०़१० टक्के आणि ग्रामपंचायत कक्षासाठी ०़५ टक्के खर्च करण्यात येतो़ कार्यालयीन खर्चासाठी जिल्हा प्रशासन आणि शासनाशी वेळोवेळी मागणी करुनही सप्टेंबर २०१३ पासून या तिन्ही कक्षांना एकही पैसा देण्यात आलेला नाही़
गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील विकासकामांवर मग्रारोहयोतून २ कोटी रुपये खर्च झाला आहे़ हे पाहता या कक्षाच्या खर्चासाठी २० हजार रुपये अनुदान मिळणे आवश्यक होते़ मात्र, या कक्षाला दमडी मिळालेली नाही़ त्यामुळे या कक्षातील दूरध्वनी सेवा गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद आहे़ तालुक्यात वा अन्य ठिकाणी या योजनेच्या कामासाठी कर्मचारी, अधिकारी स्वत:च्या मोबाईलचा वापर करीत आहेत़ त्यामुळे दूरध्वनी यंत्रणा कधी सुरु होईल, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे़
दरम्यान, मग्रारोहयोच्या कामांसाठी निधीच मिळत नसल्याने ही कामे म्हणजे दिव्याखाली अंधार, अशी स्थिती झाली असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषद वर्तुळातून उमटत आहे. (शहर वार्ताहर)
मग्रारोहयोकडून कक्षाच्या खर्चासाठी अनुदान दिले जात नसल्याने या कक्षाने खास बाब म्हणून शासनाकडे २० हजार रुपये मागणी केली होती़ ते अनुदान शासनाकडून प्राप्त होऊन खर्चही झाले़