गुणपत्रिकाच नसल्याने अकरावी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 04:42 PM2019-06-19T16:42:36+5:302019-06-19T16:44:58+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा आॅनलाईन निकाल लागून दहा दिवस लोटले तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आलेले नाही. परिणामी अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडणार आहे. शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत पदविका प्रवेश प्रक्रियेसाठी मुदत संपल्याने मुदतवाढ दिली आहे.
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा आॅनलाईन निकाल लागून दहा दिवस लोटले तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आलेले नाही. परिणामी अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडणार आहे. शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत पदविका प्रवेश प्रक्रियेसाठी मुदत संपल्याने मुदतवाढ दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून २३ हजार ३९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २३ हजार ३१५ परीक्षेला बसले होते. त्यातील २० हजार २८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल ८७ टक्के इतका लागला आहे. जिल्ह्यातील १४१ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २७ हजार ४२० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेला अद्याप प्रारंभ झाला नसल्याने यावर्षी प्रवेश प्रक्रिया रेंगाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या ६१ आहे. त्यामध्ये कला शाखेसाठी ३,५६०, विज्ञान शाखेसाठी २,४८०, वाणिज्य शाखेसाठी २,०८०, संयुक्तकरिता १८४० मिळून एकूण ९ हजार ९६० इतकी प्रवेश क्षमता आहे. जिल्ह्यात विनाअनुदानित ५१ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. कला शाखेसाठी २,९२०, विज्ञान शाखेमध्ये ४,०८०, वाणिज्य ५,२४०, संयुक्त १४०० मिळून एकूण १३ हजार ६४० प्रवेश क्षमता आहे.
स्वयंअर्थ सहाय्यितची एकूण २९ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. कला शाखेमध्ये ८८०, विज्ञान ११२०, वाणिज्य १०४०, संयुक्त ७८०, मिळून एकूण ३,८२० प्रवेश क्षमता आहे. जिल्ह्यात कला शाखेची एकूण ७,३६०, विज्ञान शाखा ७,६८०, वाणिज्य ८,३६०, संयुक्त ४,०२० इतकी प्रवेश क्षमता आहे. विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा विज्ञान शाखेकडे तर आहेच शिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रिया आॅफलाईन सुरू करणे आवश्यक होते. जेणेकरून प्रवेश अर्ज, छाननी, निवड यादी आदी कामे सोपी झाली असती. निकालपत्र देण्याबाबत अधिकृत सूचना अद्यान न काढल्याने पालकवर्ग देखील प्रतीक्षेत आहेत.