‘त्या’ शाळेच्या वेळेत अद्याप बदल नाही
By admin | Published: July 15, 2017 02:55 PM2017-07-15T14:55:31+5:302017-07-15T14:55:31+5:30
ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची होतेय गैरसोय
आॅनलाईन लोकमत
आवाशी (जि. रत्नागिरी), दि. १५ : लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या खेड तालुक्यातील त्या तथाकथित शाळेच्या वेळेत अद्याप बदल झालेला नसून, ग्रामीण भागातील वाडीवस्त्यांतून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
खेड तालुक्यातील एका नामांकित संस्थेच्या माध्यमिक शाळेची वेळ विद्यार्थी व पालक यांना विश्वासात न घेताच परस्पर बदलल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २९ जून रोजी प्रसिद्ध केले होते. उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर १५ जून रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा नियमितपणे पूर्वीच्या वेळेत सुरू झाल्या. मात्र, संस्थेचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांनी संस्थेच्या सोयीसाठी शाळेची वेळ परस्पर बदलल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली.
या माध्यमिक शाळेत परिसरातील जवळपास ५ ते ७ गावातील ५००हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. भौगोलिकदृष्ट्या विचार करता काही गावे डोंगराळ व वाहतुकीची सोय नसलेल्या परिसरातील आहेत. साहजिकच या गावातील विद्यार्थ्यांना सध्याच्या वेळेत एस. टी. बसची सोय नाही. परिणामी त्यांना ती वेळ साधण्यासाठी कित्येक अंतर पायपीट करावी लागत आहे. यावरही मुख्याध्यापक यांनी नामी शक्कल लढवत त्यांना खासगी वाहनांची सोय करा, असा भाषिक भुर्दंड बसणारा पर्याय सुचवला.
शालेय विद्यार्थिनींना शासनाकडून मोफत एस. टी. बसची सुविधा देण्यात आली आहे, तर दुसरीकडे शाळाच त्यांना खासगी वाहनाने प्रवास करण्याचा सल्ला देत आहेत. म्हणजेच विद्यार्थिनींना मिळणाऱ्या मोफत सुविधेवर टाच आणून पाल्यांना आर्थिक खाईत लोटत आहेत. हे केवळ इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू राहावी, याकरिता चाललेली ही विद्यार्थी-पालकांची गळचेपी नव्हे काय?
१५ जूनला शाळा सुरू झाल्यानंतर प्रथम दुपारी १२.३० ते ५.३० ही वेळ करण्यात आली. नंतर ती १२ ते ५ करण्यात आली आणि आता ११.३० ते ५ अशी वेळ सुरु आहे. सातत्याने बदलणाऱ्या या वेळेच्या गणिताने शाळेतील अभ्यासक्रमावरही परिणाम होत आहे. एक तासिका कमी झाली तरी विद्यार्थ्यांचेच शैक्षणिक नुकसान आहे. मात्र, याकडे संचालक मडळ, मुख्याध्यापक डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे.