राजापूर तालुक्यात केवळ एकच कोविड केअर सेंटर कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:32 AM2021-05-19T04:32:28+5:302021-05-19T04:32:28+5:30
राजापूर : गतवर्षी कोरोनावर विजय मिळवणाऱ्या राजापूर तालुक्यात यावर्षी मात्र कोरोना रुग्णांची वाटचाल दोन हजारांकडे झपाट्याने सुरू आहे. मात्र, ...
राजापूर : गतवर्षी कोरोनावर विजय मिळवणाऱ्या राजापूर तालुक्यात यावर्षी मात्र कोरोना रुग्णांची वाटचाल दोन हजारांकडे झपाट्याने सुरू आहे. मात्र, तालुक्यामध्ये केवळ एकच कोविड केअर सेंटर कार्यरत आहे. या रायपाटण कोविड केअर सेंटरची बेड क्षमता ही फक्त १०० रुग्णांची आहे़ अद्यापही रायपाटण व ओणी या ठिकाणी कोविड रुग्णालय प्रस्तावित आहे. ही दोन्ही कोविड रुग्णालये अद्यापही सुरू न झाल्याने तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांना जिल्हा कोविड रुग्णालयावरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे उपचार मिळताना राजापूर तालुक्यातील रुग्णांना विलंब होत आहे.
राजापूर तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे़ या रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणा ताेकडी पडत आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे हाल हाेत आहेत़ मंगळवारअखेर राजापूर तालुक्यात १६६९ कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे़ त्यातील ६८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण ७६८ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले असले तरी सध्या राजापूर तालुक्यात ८५६ रुग्ण कोरोनाचा सामना करत आहेत. तालुक्यातील भाैगोलिक परिस्थितीचा विचार करता बहुतांश भाग दुर्गम आहे़ त्यामुळे तिथपर्यंत आराेग्य यंत्रणा पाेहाेचण्यास उशीर हाेत आहे, तर रुग्णाला काेराेनाची लागण झाल्यास त्याला रुग्णालयापर्यंत दाखल करण्यास विलंब हाेत आहे़
प्रशासनाने नुकतेच तालुक्यातील पश्चिम भागातील जनतेची मागणी लक्षात घेऊन धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे; पण अद्यापही त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर कार्यान्वित झालेले नाही. धारतळे येथे केवळ २५ बेड क्षमता असणारे कोविड केअर सेंटर उभे राहणार आहे. सध्या राजापूर तालुक्यात ८५६ कोरोना रुग्ण कोरोनाचा सामना करत असताना तालुक्यातील सोयी- सुविधा तुटपुंज्याच आहेत.
लोकप्रतिनिधी मात्र कोविड हॉस्पिटलच्या घोषणा करण्यात गेल्या दोन महिन्यांपासून धन्यता मानत आहेत़ अद्यापही एकही कोरोना रुग्णालय व ऑक्सिजन प्लांटही कार्यान्वित झालेला नाही. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांचे हाल होत आहेत. त्यात तालुक्यात खासगी व सरकारी असे एकही कोरोना रुग्णालय नसल्यामुळे येथील जनतेला रत्नागिरी, मुंबई, कोल्हापूर आदी ठिकाणांवर अवलंबून राहावे लागत आहे. राजापूर तालुक्यातील जनतेचे दरडोई उत्पन्नही फारच कमी असून, तालुका मोठ्या प्रमाणावर आर्थिक मागास गटात मोडतो़ त्यामुळे खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करण्याइतकी क्षमता तालुक्यातील जनसामान्यांची नाही. परिणामी शासनाच्या रामभरोसे सेवेवरच कोरोना रुग्णांना अवलंबून राहावे लागत आहे. घाेषणांशिवाय जनतेच्या पदरात काहीच पडलेले नसून, जनतेला जीव वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे़