रत्नागिरीत सैन्य भरतीची अॅकॅडमी व्हावी --- मेजर विजयकुमार पिंगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 11:56 AM2019-11-28T11:56:39+5:302019-11-28T12:03:35+5:30
पश्चिम महाराष्ट्रासारख्या प्रशिक्षण अॅकॅडमी याठिकाणी निर्माण झाल्यास कोकणातील उमेदवारांची संख्या नक्की वाढेल, असा विश्वास गुजरात, गोवा आणि महाराष्ट्राचे प्रमुख मेजर जनरल विजयकुमार पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
रत्नागिरी : सैन्य भरतीतील कोकणचे योगदान हळुहळू कमी होत आहे, त्याचे कारण आम्हालाही शोधता आलेले नाही. पण इथले प्रशासन, सैनिक कल्याण बोर्ड यांनी इथल्या मुलांना प्रोत्साहन द्यावे, त्यांच्यात सैन्य भरतीतील फायद्याबाबतची जाणीव निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.
पश्चिम महाराष्ट्रासारख्या प्रशिक्षण अॅकॅडमी याठिकाणी निर्माण झाल्यास कोकणातील उमेदवारांची संख्या नक्की वाढेल, असा विश्वास गुजरात, गोवा आणि महाराष्ट्राचे प्रमुख मेजर जनरल विजयकुमार पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
रत्नागिरीत १७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या सैन्य भरतीचा समारोप बुधवारी करण्यात आला. यासाठी मेजर जनरल पिंगळे उपस्थित होते. दररोज ४ हजार ते ४ हजार ९०० उमेदवार भरतीसाठी येत होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने त्यांची सुरक्षितता, राहण्याची व्यवस्था केली होती. या मुलांसाठी १२० मोबाईल स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली होती. रत्नागिरीइतकी चांगली व्यवस्था तसेच मैदान कुठल्याही अन्य जिल्ह्यात उपलब्ध झाले नसल्याचे पिंगळे यांनी सांगितले. सामाजिक संस्थांचेही त्यांनी आभार मानल.
लेखी परीक्षा
सैन्य भरतीसाठी ४७ हजारच्या आसपास उमेदवार उपस्थित होते. त्यांच्यापैकी ४ हजार ४४५ उमेदवारांची निवड झाली. या उमेदवारांची १९ जानेवारीला कोल्हापूर येथे लेखी परीक्षा होणार आहे. त्यात उत्तीर्ण होणाऱ्या उमदेवारांना प्रशिक्षणासाठी पाठवले जाणार आहे.
५०० मोदक भेट
या भरतीसाठी उपस्थित असलेले अधिकारी आणि अन्य जवान यांच्यासाठी रत्नागिरीतील सडामिऱ्या येथील निवृत्त शिक्षिका सुलक्षणा सुभाष सावंत, कविता संदीप होळकर, कुसुम प्रदीप कांबळे यांनी ५०० मोदक तयार करून आणले होते. या आगळ्या वेगळ्या भेटीने अधिकारीही भारावून गेले.