अखंड राज्याच्या वल्गना करू नयेत
By admin | Published: May 4, 2016 10:21 PM2016-05-04T22:21:18+5:302016-05-04T23:50:50+5:30
महेंद्र नाटेकर : स्वतंत्र कोकण राज्य संघटनेची सभा
कणकवली : ज्यांना एकत्र कुटुंब ठेवता येत नाही, त्यांनी अखंड महाराष्ट्र राज्याच्या वल्गना करू नयेत, अशी टीका प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केली.स्वतंत्र कोकण राज्य संघटनेची सभा संघटनेच्या कार्यालयात झाली. यावेळी ते म्हणाले, स्वतंत्र भारत निर्माण करण्याबरोबरच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात कोकणी माणूस आघाडीवर होता. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी समतोल विकासाचे आश्वासन दिले; पण प्रत्यक्षात पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप देऊन कोकणाची उपेक्षा केली. त्यांच्यानंतर आलेल्या उर्वरित महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही यशवंतरावांची री ओढली.
७२० किलोमीटर लाभलेली किनारपट्टी, अरबी समुद्र, मासे, जागतिक बंदरे, पर्यटनस्थळे, घनदाट जंगले, वनौषधी, दीड दोनशे इंच कोसळणारा पाऊस, बुद्धिमान व प्रतिभावंत कोकणी माणूस, आदी कोकणची बलस्थाने आहेत. या नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून कोकणचा विकास करण्याऐवजी उर्वरित महाराष्ट्राच्या नेतृत्वाने नियोजनबद्ध प्रयत्न करून कोकणचा विकास रोखला. परराज्यांतील शक्तिशाली ट्रॉलर्सनी कोकणी मच्छिमारांना उद्ध्वस्त केले, करीत आहेत. जागतिक दर्जाची बंदरे असूनही त्यांचा विकास केला नाही. येथील शेती-बागायतीचा विकास न करता कोकणाला आपली बाजारपेठ बनविली. शासन-प्रशासनाने येथील वृक्षांची कत्तल करून डोंगर बोडके केले. प्रचंड पाऊस पडूनही धरणे अपूर्ण ठेवली किंवा रद्द केली. त्यामुळे सर्व पाणी समुद्रात जाते. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण हिंडावे लागते. रत्नागिरी-सिंधुदुर्गातील दोन विधानसभा मतदारसंघ घटले आहेत. वैद्यकीय सेवा पुरेशी नसल्याने कोल्हापूर, गोव्याकडे प्राण वाचविण्यासाठी धाव घ्यावी लागते.
वैद्यकीय, इंजिनिअरिंग, तांत्रिक शिक्षण, विद्यापीठ, आदी नसल्याने शिक्षणावर विपरीत परिणाम झाला आहे. विना अनुदान व इतर सर्वच शिक्षण संस्थांमध्ये लाच घेतल्याशिवाय प्रवेश मिळत नाही.
यावेळी सुरेश हाटे, मोतिराम गोठिवरेकर, वाय. जी. राणे, संजय हंडोरे, प्रा. प्रकाश अधिकारी, शिवाजी देसाई, आदी पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती करणारच
कोकणची धरणे झालीच पाहिजेत; पण ती कोकणी माणसासाठी. धरणे बांधल्यामुळे पेयजलाबरोबरच पिके घेता येतील. रेल्वे आहे ती चिकमंगळूरला जाण्यासाठी. हायवे आहे तो गोव्याला जाण्यासाठी. कोकणासाठी काहीही नाही. कोकणच्या सर्व समस्या न सोडवता राज्याचे तुकडे पाडू देणार नाही, अशी वल्गना करणाऱ्यांचा निषेध करतो.
ज्या कोकणी माणसांनी देश स्वतंत्र केला, संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला, तो कोकणी माणूस सर्वंकष विकासासाठी गोवा, उत्तरांचल, मिझोराम, छत्तीसगड, आदी राज्यांप्रमाणे घटनादत्त अधिकाराचा उपयोग करून स्वतंत्र कोकण राज्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.