धरणांना पावसाची अद्यापही प्रतीक्षाच

By admin | Published: June 21, 2016 09:25 PM2016-06-21T21:25:28+5:302016-06-22T00:15:55+5:30

पाणी जमिनीतच मुरले : पाणीसाठ्यात किंचित वाढ

There is still awaited rain for the dams | धरणांना पावसाची अद्यापही प्रतीक्षाच

धरणांना पावसाची अद्यापही प्रतीक्षाच

Next

प्रकाश वराडकर -- रत्नागिरी जिल्ह्यातील पाटबंधारेच्या मध्यम व लघु धरणांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने या धरणांमधील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाचे पाणी जमिनीतच मुरले असून, धरणात झिरपलेले नाही. त्यामुळे धरणांमधील पाणीपातळी वाढलेली नाही. मात्र, मान्सूनपूर्व पावसाने टंचाईचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. जिल्ह्यात पाटबंधारेच्या मध्यम व लघु अशा ६३ धरणांमध्ये २१ जून २०१६ रोजी १९२.७७ दशलक्ष घनमीटर अर्थात ४३.३८ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला. मात्र, धरण क्षेत्रात हा पाऊस न झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. यावर्षी मान्सूनने कोकणला चकवा दिला आहे. कोकणमार्गे मान्सून न येता अन्य मार्गाने विदर्भात पोहोचला आहे. मंगळवारी जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला. हा पाऊस म्हणजे मान्सूनची हजेरी असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, दमदार पावसाची जिल्हावासीयांना अजूनही प्रतीक्षाच आहे. जिल्ह्यात ६३ धरण प्रकल्पांपैकी २८ प्रकल्पांमध्ये २० टक्केपेक्षाही कमी पाणीसाठा आहे. त्यामध्ये चिंचाळी, तुळशी, सोंडेघर, सुकोंडी, आवाशी, टांगर, पंचनदी, नातूवाडी मध्यम धरण प्रकल्प, तिवरे, फणसवाडी, असुर्डे, राजेवाडी, साखरपा, निवे, गवाणे, बेणी, पन्हाळे, बेर्डेवाडी, हर्दखळे, कशेळी, तळवडे, दिवाळवाडी, परुळे, कोंड्ये, काकेवाडी, गोपाळवाडी, जुवाठी या धरणांचा समावेश आहे. १२ धरणांमध्ये पाण्याची स्थिती चांगली असून, त्यामध्ये ५१ टक्के ते ९४ टक्के या दरम्यान पाणीसाठा आहे. या धरणांमध्ये मुचकुंदी, अर्जुना, चिंचवाडी, पणदेरी, शेलारवाडी, मालघर, अडरे, खोपड, आंबतखोल, तेलेवाडी, गडनदी, रांगव या धरणांचा समावेश आहे. लांज्यातील केळंबा व राजापूर तालुक्यातील ओझर ही धरणे कोरडी आहेत. यातील काही धरण प्रकल्प अजूनही पूर्णत्वास न गेल्याने त्यामध्ये पाणीसाठा नाही.
पाटबंधारे धरणांच्या क्षेत्रात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी अत्यल्प आहे. १ जून २०१६पासून आत्तापर्यंत या ६३ पैकी ६२ धरणांच्या क्षेत्रात एकूण १०८७१ मिलिमीटर पर्जन्यवृष्टी झाली आहे. आंबतखोल धरण क्षेत्रात अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. धरण क्षेत्रातील पर्जन्यमान मोजण्यासाठी पर्जन्यमापक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे दररोज पडणाऱ्या पावसाची माहिती ही त्या-त्या दिवशीच उपलब्ध होणार आहे.


पाणीकपात मात्र बंद : पाच प्रकल्पांमध्ये पाण्याचा ओघ सुरु
विहिरी, नळांना पाणी...
धरणांमध्ये पाणीसाठा मोठ्या प्रमाणात झाला नसला तरी पावसाचे पाणी जमिनीत मुरले आहे. त्यामुळे आटलेल्या विहिरींना पाणी आले आहे. पाटबंधारे धरणांच्या बाजूला उभारलेल्या जॅकवेलवर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील ९२ नळपाणी योजनांच्या पाण्यात याआधी कपात करण्यात आली होती. मात्र, आता नळ योजनांना पूर्ववत पाणीपुरवठा होत असल्याचे सांगण्यात येत आहे.


हरचिरी धरण पातळीत वाढ
रत्नागिरी तालुक्यातील पाच ग्रामपंचायती व नगर परिषदेच्या नळ योजनांना पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडिसीच्या हरचिरीसह पाच कोल्हापूर धरण प्रकल्पांमध्ये पाण्याचा ओघ सुरू झाला आहे. चार धरणांमधील पाणी मे अखेरीस संपले होते. केवळ हरचिरी धरणातील पाणी योजनांना पुरवठा केला जात होता. मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीनंतर पाण्यात केलेली कपात रद्द करण्यात आली आहे. कुवारबाव, नाचणे, मिरजोळे, कर्ला, आंबेशेत, शिरगाव या गावांना एमआयडिसीकडून पाणीपुरवठा केला जातो. तसेच रत्नागिरी नगर परिषदेला अंशत: पाणीपुरवठा केला जातो.

Web Title: There is still awaited rain for the dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.