नमन मंडळांमध्ये अजूनही संभ्रमावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:32 AM2021-03-17T04:32:07+5:302021-03-17T04:32:07+5:30
असगोली : काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिमगाेत्सव साजरा करण्याबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबत नवनवीन अध्यादेश काढले जात असल्याने नमन ...
असगोली : काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिमगाेत्सव साजरा करण्याबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबत नवनवीन अध्यादेश काढले जात असल्याने नमन मंडळांमध्ये अजूनही संभ्रमावस्था आहे.
कोकणातील पारंपरिक आणि कोकणवासियांचा आवडता सण म्हणजे शिमगोत्सव. हा शिमगोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आला आहे. या शिमगोत्सवात संकासूर अर्थात खेळे हे परंपरेनुसार गावोगावी गावभोवनीसाठी फिरतात. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिमगोत्सवाबाबत काही अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत. फाक पंचमीला पहिली होळी जाळली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नमन मंडळ आपापले खेळे घेऊन गावभोवनीसाठी बाहेर पडतात. काही खेळे गाव भोवनीसाठी बाहेर पडले की, मोठ्या होळीच्या आदल्या दिवशी आपापल्या गावात जातात. परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने नियमावलीची भलीमोठी यादी जाहीर केली आहे. त्यामुळे शिमगोत्सवात गावभोवनीला बाहेर पडावे की नाही, या संभ्रमात नमन मंडळ आहेत.
शासनाच्या नियमावलीनुसार २५ लोकांसमवेत सण साजरे करावेत, असे म्हटले जात आहे. पण, नमन मंडळांनी प्रशासनाकडे विचारणा केली असता प्रशासन कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. त्यामुळे शिमगोत्सव दोन दिवसांवर आला असून, काय निर्णय घ्यावा, या विचारात नमन मंडळे आहेत.