सर्वसामान्यांमध्ये अजूनही गांभीर्य नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:32 AM2021-05-07T04:32:32+5:302021-05-07T04:32:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : आधी जमावबंदी, मग संचारबंदी करून झाली. रुग्णालयातील सुविधा वाढविण्यात आल्या. कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : आधी जमावबंदी, मग संचारबंदी करून झाली. रुग्णालयातील सुविधा वाढविण्यात आल्या. कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या. जनजागृतीवर भर दिला गेला. तरीही कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. एप्रिल महिन्यात ११ हजार रुग्ण सापडल्यानंतर आता मे महिन्यातही पहिल्या पाच दिवसात अडीच हजाराहून अधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. तरीही अजून लोकांमध्ये गांभीर्य नाही, अशी स्थिती दिसत आहे.
एप्रिल महिन्याच्या ३० दिवसात रोज ३७५ च्या सरासरीने ११ हजार २५४ रुग्ण सापडले. मे महिन्याच्या पहिल्या पाच दिवसात रोज ५१३ या सरासरीने २,५६६ रुग्ण सापडले आहेत. ही स्थिती चिंताजनक आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणा या तीनही माध्यमातून आणि त्या त्या पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जनजागृतीवर मोठा भर दिला जात आहे. मात्र तरीही अजून रस्त्यावरची गर्दी कमी होत नाही. अनेक गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने कडक संचारबंदीची अंमलबजावणी केली जात आहे. शहरी भागात मात्र संचारबंदीचा पूर्ण बट्ट्याबोळ केला जात आहे.
संसर्ग हेच कोरोनावाढीचे एकमेव कारण असल्याने संचारबंदीचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. लोक एकमेकांच्या कमी संपर्कात येणे, हा या संचारबंदीचा मुख्य उद्देश आहे. महत्त्वाच्या कामासाठीच लोकांनी घराबाहेर पडावे, अशी त्यात सवलत असून, सकाळी ११ वाजेपर्यंत भाजीपाला किंवा जीवनावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी मुभा आहे. मात्र रोज या वेळेत आणि या वेळेनंतरही लोकांची रस्त्यावर गर्दी दिसत आहे. भाजी खरेदीसाठी रोज इतक्या प्रमाणात होणारी गर्दीही अनाकलनीय वाटावी, अशीच आहे. या गर्दीमुळे संचारबंदीचा, कोरोना रोखण्याचा उपाय कधीही साध्य होणार नाही, हे वाढणाऱ्या रुग्णसंख्येवरून स्पष्ट दिसत आहे.
आरोग्याच्या सुविधा
गतवर्षीच्या तुलनेत यंदा आरोग्याच्या सुविधांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मंत्री उदय सामंत यांनी ऑक्सिजन, कोविड सेंटर्स, बेड्सची संख्या या साऱ्याची गांभीर्याने दखल घेत आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांचे रोजच्या घडामोडींवर उत्तम नियंत्रण आहे. कुठे काय स्थिती आहे, काय गरजा आहेत, याकडे हे दोन्ही अधिकारी आणि त्यांच्या टीम व्यवस्थित लक्ष देत आहेत.
लोकांचे सहकार्य नाहीच
आरोग्याच्या वाढलेल्या सुविधा आणि त्यासाठी सर्व प्रयत्न रुग्ण निश्चित झाल्यानंतरचे आहेत. रुग्ण कमी व्हावेत, यासाठी लोकांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. मुळात तेथेच अजूनही रत्नागिरी जिल्हा कमी पडत आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी लोकांकडून जे सहकार्य अपेक्षित आहे, ते अजूनही मिळत नाही, हे रस्त्यावरच्या रोजच्या गर्दीवरून दिसत आहे.
रस्त्यावर शतपावली
रात्रीच्यावेळी अनेक लोक शतपावलीसाठी रस्त्यावर येत असल्याचे चित्रही रत्नागिरीत दिसत आहे. कोरोनाचा प्रभाव इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत असतानाही, महिला, मुले, घरातील ज्येष्ठ मंडळी रात्री रस्त्यावर शतपावली घालताना दिसतात. त्यांना कोरोनाची गंभीरता अजूनही कळलेली नाही.