माचाळसाठी विशेष निधी मिळणार--लांजा तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणजे माचाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:49 PM2020-03-13T12:49:25+5:302020-03-13T12:49:59+5:30
लांजा व राजापूर तालुक्यातील पर्यटन विकासासाठी १०० कोटीची तरतूद करण्याची मागणी केली. त्यानुसार लांजा तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणजे माचाळ पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती.
राजापूर : थंड हवेचे ठिकाण म्हणून राज्यातील जी ठिकाणे पर्यटनासाठी विकसित होणार आहेत, त्यात माचाळचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे माचाळच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. आमदार राजन साळवी यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
कोकणातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर आमदार राजन साळवी यांनी चर्चेत सहभागी होत वस्तुस्थितीजन्य चित्र सभागृहासमोर ठेवून शासनाचे लक्ष वेधले होते. त्यांनी आमदार साळवी यांनी सर्वप्रथम लांजा व राजापूर तालुक्यातील पर्यटन विकासासाठी १०० कोटीची तरतूद करण्याची मागणी केली. त्यानुसार लांजा तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणजे माचाळ पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील थंड हवेची ठिकाणे व समुद्र किनारे व पर्यटनस्थळी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा करण्यासाठी १ हजार ४०० कोटी रूपये इतक्या निधीची तरतूद केली असून, त्यामध्ये माचाळ या पयर्टन स्थळाचा समावेश आहे.
जिल्ह्याचा पर्यटन विकास डोळ्यासमोर ठेवून साळवी यांनी वेळोवेळी शासन दरबारी निवेदन देऊन अनेकवेळा पाठपुरावा केला होता. तसेच शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही निवेदन दिले होते. माचाळचा समावेश आता या यादीत झाला असल्याने आमदार साळवी यांनी अनेक वेळा केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
माचाळची ओळख
कोकणातील मिनी महाबळेश्वर म्हणून माचाळने आधीपासूनच आपली ओळख कायम ठेवली आहे. सुविधा निर्माण झाल्या तर तेथे जाणाºयांची संख्या वाढेल.