गडगडी कालव्याचे पाणी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2016 12:11 AM2016-02-18T00:11:12+5:302016-02-18T21:15:35+5:30
हालचाली सुरु : कालवा सफाईचे काम वेगात
मार्लेश्वर : गडगडी धरणाच्या डाव्या कालव्यातील पाणी ग्रामस्थांना देण्याच्या हालचाली शासनाकडून सुरू झाल्या आहेत. यासाठी आवश्यक असलेला कालवा सफाईचे काम यंत्राच्या सहाय्याने सुरू झाले आहे. आरपीआयचे तालुकाध्यक्ष अ. वि. जाधव यांनी चार दिवस आपल्या सहकाऱ्यांसह पाण्यासाठी छेडलेल्या बेमुदत उपोषणाची दखल शासनाने घेतली आहे. यामुळे जाधव यांचे उपोषण खऱ्या अर्थाने यशस्वी झाले आहे.
डाव्या कालव्यातून धरणाचे मिळणारे पाणी चौदा किमीपर्यंत असलेल्या शेतकऱ्यांना मिळावे, किंबहुना तो आपला हक्क आहे. या मागणीसाठी जाधव, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र घाग व सुदाम गमरे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देवरूख तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. अनेक अधिकाऱ्यांनी जाधव यांची भेट घेऊन उपोेषण स्थगित करण्याची विनंती कली होती.
मात्र, कालव्याचे पाण्याबाबत ठोस निर्णय कधी मिळणार? याची लेखी हमी शासनाकडून मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार जाधव यांनी केला होता. शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन २८ फेब्रुवारीपूर्वी कालव्याची सफाई करुन पाणी दिले जाईल, अशी हमी दिली. दिलेल्या मुदतीत पाणी न मिळाल्यास पुन्हा एकदा आंदोलन तीव्र करू, असा इशारा देऊन जाधव यांनी आंदोलन स्थगित केले होेते.
आंदोलन स्थगितीसाठी दिलेला शब्द अखेर शासनाला पाळावा लागला. पाणी देण्यासाठी आवश्यक असलेली कालवा सफाई त्यातील मोठमोठे दगड, माती, वृक्ष तोडून आधुनिक यंत्राने सफाईचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे.
उपोषणाप्रसंगी देवरूख येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह स्वमालकीच्या जागेत न्यावे, ही मागणीदेखील करण्यात आली होती. शासनाने १० एप्रिलपूर्वी हे वसतिगृह स्वमालकीच्या जागेत स्थलांतरीत करण्यात येईल, अशी लेखी ग्वाही दिली होती. ही ग्वाही पूर्ण न केल्यास सामाजिक न्याय विभाग, रत्नागिरी येथील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन उभारु, असेही जाधव यांनी जाहीर केले आहे. दरम्यान कालव्याचे काम सुरु झाल्याने ग्रामस्थांना आता पाणी मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. (वार्ताहर)
गडगडी धरणाचे पाणी १४ किमीपर्यंत मिळाल्यास येथील शेतकऱ्यांना उन्हाळी शेतीचाही लाभ घेता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे कालव्याचे काम त्वरित होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आता हालचाली सुरु झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.